Kartiki Ekadashi : लाखो मुखातून हरिनामाचा गजर! कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीत भक्तीचा महापूर

प्रभात वृत्तसेवा
आळंदी – ( ज्ञानेश्वर फड )
अल्याड पल्याड पताकांचे भार । मध्यें मनोहर इंद्राहणी ॥
पिवळ्या पारव्या आणिक हिरव्या । नीळवर्ण सार्या लखलखित ॥
जरी जर्तातरी जाल्या रानभरी । विजा त्यावरी खेळताती ॥
सर्पाकार दंड तारांगणावाणी । पताका तिकोनी दाटताती ॥
नामा म्हणे तेथें पताकांचे भार । केव्हडें भाग्य थोर ज्ञानोबाचें ॥
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ४ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी एकादशीला आळंदी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. शुक्रवार रात्रीपासूनच भाविकांची वाढलेली उपस्थिती, ज्ञानोबा-तुकारामच्या अखंड जयघोषात दुमदुमणारा देऊळवाडा परिसर आणि टाळ-मृदंगाच्या नादाने संपूर्ण अलंकापुरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. कार्तिकी एकादशीच्या (१५ नोव्हेंबर) सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच शहरात गर्दी केली.
कार्तिकी एकादशी सोहळ्याच्या पूजेची तयारी मध्यरात्रीपासून सुरू झाली. स्वकाम सेवा मंडळाच्या सेवकांनी देऊळवाडा परिसर स्वच्छ करून वातावरणात अधिक पावित्र्य आणले. घंटानादानंतर, रात्री साडेबारा वाजल्यापासून पहाटे दीडपर्यंत ११ ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारांच्या साक्षीने संजीवन समाधीवर पवमान अभिषेकाची विधी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. मुख्य गाभारा आणि देऊळवाडा परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीने अधिक सुशोभित करण्यात आला होता.
देऊळवाडा परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत आणि सुगंधी सामग्रीने अभिषेक करण्यात आला. यानंतर, केशरी मेखला, शाल, तुळशीहार आणि सोनेरी मुकुटाने समाधी अधिक देखणी व विलोभनीय दिसत होती. अभिषेकानंतर आरती करण्यात आली, तसेच देवस्थानतर्फे उपस्थित मान्यवरांना नारळ प्रसाद देण्यात आला.
ठाणे जिल्ह्यातील भेरे दाम्पत्याला महापुजेचा मान-
एकादशीला महापूजेसाठी दर्शन रांगेत उभे असलेल्या पहिल्या दाम्पत्याला मान दिला जातो. यावर्षीच्या कार्तिकी एकादशी सोहळ्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सावरोली बुद्रुक येथील वारकरी शंकर भेरे (वय ८०) आणि निर्मला भेरे (७०) या दाम्पत्याला मिळाला. हे दाम्पत्य नित्यानेमाने महिन्याचे वारकरी आहेत.
लग्नानंतर त्यांनी जोडीने आळंदी पंढरीची वारी सुरू केली. ती वाजतागायत अखंड सुरू आहे. लग्नाआधी देखील ते वारी करत असत. माऊलींच्या महापुजेचा मान मिळाल्याने ते भारावून गेले होते. पूजेनंतर देवस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. हा सन्मान म्हणजे वारकरी परंपरेतील निष्ठा आणि सेवेचा गौरव होता.
दर्शनरांगा दत्त आश्रमापर्यंत-
कार्तिकी एकादशीच्या दिवशी (१५ नोव्हेंबर) पहाटेपासूनच माऊलींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी लाखो वारकरी आळंदी शहरात दाखल झाले होते. भाविकांची गर्दी इतकी प्रचंड होती की, वैतागेश्वर मंदिरालगतचा दर्शन मंडप सकाळच्या वेळीच पूर्णपणे खचाखच भरला. दर्शनरांगा दत्त आश्रमापर्यंत पोहोचल्या होत्या, तरीही वारकऱ्यांचा उत्साह कायम होता. देवस्थाच्या वतीने दर्शनबारितील वारकऱ्यांना फराळ, पाणी याचे वाटप करण्यात येत होते.
पवित्र स्नानासाठी इंद्रायणी घाटावर वारकऱ्यांची गर्दी-
इंद्रायणी नदीच्या घाटावर पवित्र स्नानासाठी भाविकांची पहाटेपासूनच प्रचंड गर्दी उसळली होती. दुसरीकडे वारकऱ्याच्या खांद्यावर पताका, डोईवर तुळशी वृंदावन, मुखात हरिनामाचा गजर आणि हातात टाळ-मृदंगाचा नाद… या भक्तीमय वातावरणात वारकरी दिंडी प्रदक्षिणेत तल्लीन झालेले दिसत होते. प्रदक्षिणा करून इंद्रायणी घाटावर पोहोचताच वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित होत होता.
आज माऊली मंदिरात होणारे कार्यक्रम –
-पहाटे 2 ते 3.30 : पवमान अभिषेक व दुधारती
-पहाटे 3.30 ते 4 : खेडचे प्रांत यांच्याहस्ते पंचोपचार पूजा.
-पहाटे 3 ते 6 : नांदेडकर दिंडी क्र.15 यांच्यातर्फे मुंक्ताई मंडपात काकडा भजन
-सकाळी 5 ते 11.30 : श्रींच्या चल पादुकांवर महापूजा
-दुपारी 12 ते 12.30 : महानैवेद्य
-दुपारी 4 ते सायंकाळी 7 : रथोत्सव
-दुपारी 4 ते सायंकाळी 6 : वीणा मंडपात ह.भ.प. माधव बडवे यांच्यातर्फे कीर्तन
-रात्री 8.30 ते 9 : श्रींची धुपारती
-रात्री 9 ते 11 : ह.भ.प. केंदूरकर महाराज यांच्यातर्फे वीणा मंडपात कीर्तन
-रात्री 11 ते 12 : पास धारकांना खिरापत पूजा, प्रसाद वाटप, फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप





