न्यूयॉर्क : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त आयात शुल्क लादले आहे, असे व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५० टक्के कर लादले आहेत, त्यामध्ये भारताने रशियाचे तेल खरेदी केल्याबद्दलच्या अतिरिक्त २५ टक्के करांचाही समावेश आहे. हे वाढीव आयात शुल्क २७ ऑगस्टपासून लागू होईल. जवळपास चार वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन दरम्यानचे युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी मोठे सामाजिक दडपण आणले आहे. ट्रम्प यांनी कृती केली आहे. त्यांनी भारतावर निर्बंध घातले आणि अन्य कारवाईही केली, हे तुम्ही बघितले असेलच. हे युद्ध थांबलेच पाहिजे, ही आपली भूमिका त्यांनी चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे, असेही लेविट म्हणाल्या. रशियाकडून स्वस्त दराने खरेदी केलेल्या तेलाची विक्री करून भारत मोठा नफा कमावत असल्याचा आरोप अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट एका मुलाखती दरम्यान म्हणाले होते. अमेरिकेने लावलेले अतिरिक्त आयात शुल्क अवाजवी आणि असमर्थनीय असल्याचे भारताने म्हटले आहे. अन्य कोणत्याही मोठ्या अर्थसत्तेप्रमाणे भारत देखील आपल्या देशवासियांच्या हितांचे आणि आर्थिक सुरक्षिततेचे रक्षण करेल, असेही भारताने म्हटले आहे.