कर्नाटक विधानभवन बनले भाजपचा शॉपिंग मॉल; ‘त्या’ प्रकरणावरून कॉंग्रेसने साधला निशाणा

बंगळुरू – कर्नाटक विधानभवनाच्या आवारात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अभियंत्याकडे साडे दहा लाखांची रोकड सापडली असून त्यावरून कॉंग्रेसने भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपने कर्नाटक विधान भवनाचा शॉपिंग मॉल करून टाकला आहे, भाजप म्हणजे आता ब्रोकर जनता पार्टी झाला आहे.मुख्यमंत्री किंवा पीडब्ल्युडी विभागाच्या मंत्र्यांना लाच देण्यासाठीच ही रक्कम विधान भवनात आणण्यात आली होती असेही कॉंग्रेसने म्हटले आहे.
इंधन स्वस्त झाले, सरकारला मोठा फायदा, पण या कारणामुळे किंमती कमी करण्यास नकार
विधानभवनाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पीडब्ल्युडी विभागाचे अभियंता जगदीश यांच्याकडून गुरवारी ही रोकड जप्त केली होती. या रकमेविषयी त्याने समाधानकारक खुलासा न केल्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या अभियंत्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी त्याला रितसर अटक केली आहे. त्यावरून कॉंग्रेसने भाजप सरकारच्या कारभारावर दलालीचा, आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौफेर सरबत्ती केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री बोम्माई यांनी चार वर्षांपुर्वीचे एक प्रकरण उकरून काढले.
त्यावेळी एका कॉंग्रेस आमदाराकडून कशी 25 लाख रूपयांची रोकड जप्त केली गेली होंती याचा दाखला त्यांनी दिला. कॉंग्रेस नेते म्हणाले की हा अभियंता मुख्यमंत्री किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना हे पैसे देण्यासाठी आला असावा. भाजपने आता विधानभवनातच लाचखोरीचे रितसर दुकान सुरू केले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले की या सरकारमध्ये पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 40 ते 50 टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतीही सरकारी बिले पास होत नाहीत असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला. भाजपने विधानभवनाला व्यापार भवन करू टाकले असल्याचा आरोप दुसरे कॉंग्रेस नेते प्रियंक खर्गे यांनी केला आहे.





