कर्नाटकच्या राजकीय पेचावर आज सर्वोच्च न्यायालयात निघणार तोडगा ?

नवी दिल्ली : कर्नाटकातील बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर न्यायालयात येण्यास सांगितले होते मात्र, आमदारांनी भेट घेवून कोणताही तोडगा निघाला नसल्याने आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार असल्याची अपेक्षा आहे. त्यातच विधानसभा अध्यक्षांनीदेखील न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आमदारांनी दिलेले राजीनामे संविधानीक आहेत की नाही हे तपासून पाहण्यासाठी न्यायालयाने आपल्याला वेळ द्यावा अशी विनंती करणारी याचिका अध्यक्षांनी न्यायालयात दाखल केली आहे. त्यावरच आज निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदार आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या याचिकेवर सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. यावेळी दोघांच्याही बाजू ऐकूण यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, तिकडे आजपासून कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्यातच कॉंग्रेसने आपल्या सर्व आमदारांना सभागृहात हजर राहण्याचे व्हीप जारी केले आहे. तर जे आमदार गैरहजर राहतील त्यांना अपात्र ठरवण्यात येणार असल्याचेही पक्षाकडून सांगण्यात आले आहे. काल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विधासभा अध्यक्षांना भेटायला गेलेले आमदार कोणताही तोडगा न काढता मुंबईत परत आले होते.





