Pratap Sarnaik : कर्नाटक सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावीः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबईः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ्याच्या बसवर शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला. कर्नाटकातील चित्रदुर्गात कन्नड कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. एसटीचे चालक भास्कर जाधव यांच्या चेहऱ्यावर काळे फासत त्यांच्यावर देखील हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून आगामी काळात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता या घटनेप्रकरणी महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी कर्नाटकला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जोपर्यंत कर्नाटक सरकार या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत कर्नाटकला जाणारी बस सेवा पुन्हा सुरू केली जाणार नसल्याची प्रतिक्रिया मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या कथित हल्ल्याप्रकरणी कर्नाटकात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवाशांची पंचाईत
दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्र एसटी बस चालक आणि वाहक यांनी आता आम्हाला सुरक्षा दिली तरच आम्ही कर्नाटकात बस घेऊन जातो अशी भूमिका घेतली आहे. कन्नड संघटनाच्या मराठी द्वेषामुळे निष्कारण भाषिक द्वेष निर्माण होऊन याचा नाहक त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. शनिवारी सकाळपासून महाराष्ट्राच्या बस कर्नाटकात आलेल्या नसून त्यामुळे बेळगावहून महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांची पंचाईत झाली होती.
प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी कर्नाटक राज्यातील बस फेऱ्या रद्द..!#PratapSarnaik #TransportMinister #Karnataka #STBus pic.twitter.com/PpcwFxoVQW
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) February 23, 2025
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी मुंबई आगाराची बस बंगळुरू-मुंबई बस क्रमांक MH14 K Q 7714) ही येत असताना कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कर्नाटक संघटनेचे कार्यकर्ते यांनी गाडी थांबवून बस व चालकाला काळे फासले. तसेच एसटीचे चालक भास्कर जाधव यांना मारहाण देखील करण्यात आली. त्यानंतर संबंधित बसच्या चालक वाहकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी संबंधित पोलीस स्टेशनला जात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.





