महाराष्ट्राची पुनरावृत्ती कर्नाटकमध्ये होण्याची शक्यता फेटाळली; सिद्धरामय्या, शिवकुमार यांच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे

बंगळुरू – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दाव्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्या कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्रातील सत्ताबदलाची पुनरावृत्ती कर्नाटकमध्ये होण्याची शक्यता फेटाळून लावली.
महाराष्ट्रातील एका प्रचार सभेत बोलताना शिंदे यांनी कर्नाटकचा उल्लेख केला. मी नुकतीच कॉंग्रेसशासित कर्नाटकला भेट दिली. त्यावेळी महाराष्ट्राप्रमाणे त्या राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर सरकार कोसळणार असल्याची चर्चा ऐकायला मिळाली, असे त्यांनी म्हटले. त्यावर सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. शिंदे भ्रमात आहेत. ते दिवास्वप्न आहेत.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा पराभव होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकात आमचे सरकार पाडणे त्यांना जमणार नाही. आमचे सरकार पाडण्याचे बरेच प्रयत्न वर्षभरात झाले. पण, ते प्रयत्न अयशस्वी ठरले. आमचे आमदार विकले जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रासारखा बदल कर्नाटकात घडवण्याची कुठली संधी नाही, असे सिद्धरामय्या यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या शिवकुमार यांनीही शिंदे यांच्यावर जोरदार पलटवार केला. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील शिंदे सरकारची ताकद घटेल. ते सरकार टिकण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीनंतर मूळ राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेतील आमदार परततील. त्यानंतर महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि मित्रपक्षांचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असे भाकीत त्यांनी केले.





