बंगळुरू ( Karnataka Cabinet ) – कर्नाटकच्या नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचे खातेवाटप रविवारी जाहीर करण्यात आले आहे. शनिवारी, कॉंग्रेसच्या 24 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा झाला होता. यामुळे आता मंत्रिमंडळात एकूण 34 मंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विलंब न लावता रविवारी मंत्र्यांचे खातेवाटपही केले आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वतःकडे अर्थ, मंत्रिमंडळ व्यवहार, कार्मिक व प्रशासकीय सुधारणा, गुप्तहेर, माहिती तथा अन्य खाती ठेवली आहेत. तसेच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे पाटबंधारे, बंगळुरू शहर विकासाची जबाबदारी देण्यात आली आहे.
गृहमंत्रालयाची जबाबदारी डॉ. जी. परमेश्वरा यांच्याकडे असणार आहे. श्रीरामलिंगा रेड्डी यांना परिवहन खाते देण्यात आले आहे. याशिवाय कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे सुपुत्र तथा चित्तापूरचे आमदार प्रियांक खर्गे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राजची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.