बंगळुरू – कर्नाटकचे माजी पोलीसप्रमुख ओम प्रकाश रविवारी त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह पडला होता. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे. बंगळुरूमधील तीनमजली घरात ६८ वर्षीय प्रकाश राहत होते. त्या घरातील तळमजल्यावर त्यांचा मृतदेह आढळला. त्याविषयीची माहिती प्रकाश यांच्या पत्नी पल्लवी यांनी पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रकाश यांच्या मृतदेहावर जखमांचे व्रण आढळले. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. त्या हल्ल्यामागे कुटूंबातील सदस्य असावा असा संशय बळावला आहे. त्यातून पोलिसांनी प्रकाश यांच्या पत्नी आणि कन्येची चौकशी सुरू केली आहे. काही निकटवर्तीयांकडून जीविताला धोका असल्याची साशंकता प्रकाश यांनी याआधी व्यक्त केली होती. ते मूळचे बिहारचे रहिवासी होते. भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) १९८१ च्या तुकडीतील ते अधिकारी होते. प्रदीर्घ सेवेनंतर ते कर्नाटकच्या पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झाले. त्या पदावर १ मार्च २०१५ ला त्यांची नियुक्ती झाली होती.