“रोहयो’त कर्जत-जामखेडचा डंका!

कर्जत/जामखेड – कर्जत आणि जामखेड हे दोन तालुके पूर्वी दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखले जायचे. परंतु आता ही ओळख पुसली जाऊन या ना त्या कारणाने कर्जत-जामखेड तालुके राज्यस्तरावर आपला नावलौकिक मिळवत आहेत. शिवाय नुकतेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये जामखेड व कर्जत जिल्हा स्तरावर अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर आले आहे.
रोजगार हमी योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांचा गुणगौरव समारंभ यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉइंट येथे राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जिल्ह्यातील जामखेड व कर्जत येथील गटविकास अधिकारी प्रकाश पोळ आणि अमोल जाधव यांचादेखील नामोल्लेख आवर्जून करण्यात आल्याने ही प्रत्येक कर्जत-जामखेडकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
मागील दोन वर्षांत कर्जत-जामखेड तालुक्यामध्ये संरक्षक भिंत, सिमेंट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक रस्ते, पाणंद रस्ते, वृक्ष लागवड, सिंचन विहिरी, गाय गोठे/ शेळीपालन शेड, फळबाग अशी नावीन्यपूर्ण कामे रोहयोच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यात करण्यात आली आहेत.
याचा फायदा मतदारसंघातील सर्वसामान्यांना झाला असून, त्याची दखल शासनदरबारी घेण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा समन्वय योग्य असेल, तर नक्कीच कोणतीही अडचण आडवी येत नाही. उलट कामे मार्गी लागण्यास त्याचा फायदा होतो. तसेच अधिकारी कार्यक्षम आणि कल्पक असतील तर नक्कीच अशा प्रकारची यशाची शिखरे पार करण्यात कोणताही अडथळा येत नाही.
जामखेडमध्ये 2 लाख 31 हजार 745 मनुष्य दिनाची निर्मिती करून 11.97 कोटी रुपये खर्च करून गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व सहकारी टीमने उत्तम कार्य करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. कर्जतमध्ये 1 लाख 88 हजार 98 मनुष्य दिनाची निर्मिती करून गटविकास अधिकारी अमोल जाधव आणि त्यांच्या संपूर्ण टीमने उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली आहे.
“मागील 2 वर्षांत “रोहयो’च्या माध्यमातून नावीन्यपूर्ण कामे करून गटविकास अधिकारी पोळ व जाधव यांनी उत्कृष्ट जबाबदारी पार पाडत मतदारसंघाची मान उंचावली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! चांगले अधिकारी मतदारसंघात असतील, तर सामान्यांचा फायदा होतो. परंतु काही लोक चांगल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यातच जास्त रस ठेवतात. अशाच पद्धतीचे उत्तम काम महसूल विभागांतर्गत प्रांताधिकारी अजित थोरबोले आणि दोन्ही तहसीलदार यांच्या माध्यमातून झाले आहे.” – आ. रोहित पवार





