पुण्यात कारगिल विजय दिवस रौप्य महोत्सवी वर्षाचा प्रारंभ चंद्रकांत पाटलांच्या हस्ते होणार

पुणे : सरहद संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी कारगिल, लेह येथे सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. यावर्षी कारगिल विजय दिवसाच्या रौप्य महोत्सवी वर्षात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्याचा प्रारंभ महाराष्ट्राचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते तर प्रसिद्ध उद्योगपती अभय फि रोदिया यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. 22 जुलै 2023 रोजी सकाळी 11. वाजता एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ पुणे 30 येथे करण्यात येणार आहे.
या प्रसंगी विविध क्षेत्रात देशाचा गौरव वाढविणार्या व्यक्तींना राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा हा पुरस्कार महाराष्ट्र युनिर्व्हसिटी ऑफ हेल्थ सायन्स च्या कुलगुरू ले. जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) तसेच दै. पुढारी या वृत्तपत्र समुहाचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव तर दहशतवाद्यांना कंठस्नान घालणार्या भारतातील क्रमांक 3 चा शौर्य पुरस्कार असलेल्या शौर्यचक्र विजेते कर्नल वेंबू शंकर, जम्मू काश्मीरमध्ये तरूणांमध्ये देशाप्रती निष्ठेची जोपासना करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे शहनवाज शाह, पुण्यातील युद्ध स्मारकाच्या निर्मितीसाठी आयुष्य वेचणार्या ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कर्दळे यांचा मरणोत्तर सन्मानही करण्यात येणार आहे.
सरहद संस्थेच्या पुढाकाराने या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कारगिलमधील आर्मी स्कूल येथे भारतीय लष्कराच्या वतीने 72 फुटी राष्ट्रध्वज उभारण्यात आला असून कारगिल भेट देणार्या पर्यटकांचे ते एक महत्त्वाचे आकर्षण असणार आहे. याशिवाय कारगिल मध्ये रक्तदान शिबीर, कारगिल गौरव यात्रा, विविध पुस्तकांचे प्रकाशन, परिसंवाद, व्याख्याने अशा विविध मार्गाने कारगिल युद्धाचा विजयाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ही माहिती डॉ. शैलेश पगारिया आणि जाहिद भट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.




