Kareena Kapoor : करीना कपूरचा ‘दायरा’ चित्रपट ओटीटीवर; कधी आणि कुठे पाहता येणार?
Kareena Kapoor : मेघना गुलजार दिग्दर्शित 'दायरा' १८ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता.

Kareena Kapoor : अभिनेत्री करीना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन यांचा ‘दायरा’ चित्रपट आता ओटीटीवर पाहता येणार आहे. या चित्रपटात करीना डीसीपी अजूनी कोहलीच्या भूमिकेत दिसली आहे.
मेघना गुलजार दिग्दर्शित ‘दायरा’ आज १३ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी हा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम झाला आहे. सत्य घटनांवर आधारित मेघना गुलजार दिग्दर्शित ‘दायरा’ १८ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे, IMDb वर या चित्रपटाला ७.१ रेटिंग मिळाले आहे.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल अशी मोठी अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही. करीनाच्या कारकिर्दीतील सर्वात खराब ओपनिंग करणारा हा चित्रपट ठरला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट पूर्णपणे अपयशी ठरला.
‘दायरा’ हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात क्षिती जोग आणि जितेंद्र जोशी हे मराठी कलाकारही झळकले. आता ओटीटी प्रदर्शनानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.
काय आहे ‘दायरा’ चित्रपटाची कथा?
सत्य घटनेवर आधारित ‘दायरा’ची कथा एका महिला डॉक्टरवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाभोवती फिरते. डीसीपी रमन कुमार (पृथ्वीराज सुकुमारन) चारही आरोपींचा एन्काउंटर करतो.
या चित्रपटात डीसीपी अजूनीच्या भूमिकेत असलेली करीना आणि रमनच्या भूमिकेत असलेला पृथ्वीराज यांच्यातील न्याय, शिक्षा आणि कायद्याबद्दलचे पूर्णपणे भिन्न विचार एका नव्या वादाला तोंड फोडतात.
हेही वाचा:
US Flights : अमेरिकेत सर्व विमानांची उड्डाणे बंद; हजारो प्रवासी विमानतळावर अडकले





