करंदी गावात 14 दिवस लॉकडाऊन !

केंदूर : येथे दोन दिवसांत तब्बल 6 रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याने संपूर्ण गाव 14 दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शनिवारी (दि. 18) गावाला भेट देऊन संपूर्ण गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करून गाव 14 दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दोन आठवड्यापूर्वी पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील उपबाजारात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर मार्केटयार्ड पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. करंदी गावच्या चारही बाजूला कोरोनाचे रुग्ण अढळून आले आहेत.
तळेगाव रोड 1, बनसुडी 1, धमारी रोड परिसरात 1 तर केंदूररोड परिसरात एकाच कुटुंबातील 3 सदस्यांना करोनाची लागण झाली आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 40 व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळे 18 जुलै ते 31 जुलैपर्यंत संपूर्ण गाव बंद राहणार आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने गावात येणारे मुख्य रस्ते बंद केले आहेत. किराणा दुकानासह दूध संकलन केंद्र दिवसात फक्त चार तास सुरू राहणार आहे. मेडिकल, दवाखाना, पाणी जार विक्रेते व पिठाची गिरणी वगळता सर्वच दुकाने बंद राहणार आहेत.
दरम्यान गाव पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून आल्याचे तलाठी संदीप शिंदे व ग्रामसेवक दिलीप पानसरे यांनी सांगितले.





