Karale Master : कराळे मास्तरांना २४ हजार मतं; पदवीधर निवडणुकीत रंगली चर्चा
कराळे मास्तरांची मतदानाच्या काही तास आधी सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

Karale Master – पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे. काल सकाळी आठ वाजता मतमोजणीच्या प्रकियेला सुरुवात झाली होती. मात्र, मतपत्रिकांची विभागणी होऊन प्रत्यक्ष मोजणी सुरु व्हायला दुपारचे चार वाजले होते. या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नितेश कराळे यांना पहिल्या पसंतीची 24,249 मते पडली आहेत.
अनेकजण कराळेंच्या या कामगिरीचे कौतुक करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी(शप) च्या नेत्या विद्या चव्हाण यांनी कराळे यांच्याबाबत भाष्य केले असून, अशी कोणाची पक्षातून हकालपट्टी होऊ नये आणि कार्यकर्त्यांनी देखील पक्षावर ही वेळ आणू नये, असे चव्हाण यांनी म्हटले. कराळे मास्तरांबाबत यापेक्षा जास्त बोलण्यास त्यांनी नकार दिला.
कराळे मास्तरांची मतदानाच्या काही तास आधी सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी स्वतः निवडणूक लढवून पक्षशिस्तीचे उल्लंघन करणे आणि शरद पवार गटाचा आपल्याला पाठिंबा असल्याचा संभ्रम निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. पक्षाने हकालपट्टी केल्याचा निर्णय नितेश कराळे यांच्या जिव्हारी लागला होता.





