Satara News : कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील कॅथलॅब सातारला हलवण्याचा घाट; प्रहारचा आंदोलनाचा इशारा

सातारा : वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असणाऱ्या जिल्हा रुग्णालयांना अँजिओप्लॉस्टी करणाऱ्या कॅथलॅब मंजूर नाहीत, तरीसुद्धा कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाची कॅथ लॅब तेथे जागा उपलब्ध नसल्याचे सांगत आरोग्य विभागाने सातारा जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा घाट घातला आहे.
त्यामुळे कराडकरांना माफक दरामध्ये होणाऱ्या शस्त्रक्रियांपासून वंचित रहावे लागणार आहे. आरोग्य विभाग साताऱ्यात ही लॅब हलवून स्वतःच नियमाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात कोणत्याही शासकीय सूत्रांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. केवळ तीन आठवड्यात शासनाच्या आरोग्य विभागाने कराडची लॅब साताऱ्याला हलवण्याचा निर्णय जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅथलॅब ही कराड येथील उपजिल्हा रुग्णालयातच राहील असे आश्वासन दिले होते.
आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयांशी जिथे वैद्यकीय महाविद्यालय संलग्न नाहीत अशा जिल्हा रुग्णालयांना बनवण्यासाठी राज्यात 19 ठिकाणी 231 कोटी रुपयांचा निधी दिला आहे या निधी अंतर्गत कार्डिओलॉजिस्ट सहा नर्स तसेच कुशल मनुष्यबळ आणि लॅबच्या अत्याधुनिक सुविधा दिल्या गेल्या आहेत. मात्र कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याची अडचण पुढे करण्यात आली आहे. येथील कॅथलॅबसाठी 71 लाख 58 हजार रुपयांचा निधी मंजूर आहे.
मात्र, साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात जागा उपलब्ध असल्याचे सांगत आरोग्य विभागाने तसा अध्यादेश काढला आहे. वेणूताई चव्हाण येथे कराडसह सातारा, खटाव, वाळवा शिराळा, कडेगाव, पाटण तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. वृद्धापकालाट हृदयाचे त्रास, रक्तदाब यामुळे हृदय रुग्णांची संख्या येथे जास्त असते. ग्रामीण भागात ही सुविधा उपलब्ध होत असल्याने समाधानाचे वातावरण होते. मात्र, केवळ जागा उपलब्ध नसल्याच्या तांत्रिक कारणावरून हलवण्याचा घाट घातला जात असल्याने नाराजीचे वातावरण आहे.
आरोग्य विभागाचे कानावर हात
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दरेगाव येथे भेटून वस्तुस्थिती सांगितली होती. त्यावेळी ना. शिंदे यांनी ही लॅब कराडमध्ये राहील, अशी ग्वाही दिली होती. मात्र असे काय झाले की आरोग्य विभागाने थेट लॅबचे स्थलांतर साताऱ्याला करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आरोग्य उपसंचालकांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

