नागठाणे : सातारा जिल्ह्याला आता चार कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. त्यांच्या सहकार्याने व मुख्यमंत्री फडणवीस, उप मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शना खाली कराड उत्तरेच्या विकासाचा अनुशेष भरून काढू, अशी ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी रविवारी नांदगाव येथील सत्कार समारंभावेळी दिली. मतदार संघातील सिंचन पाण्यासाठी तसेच जलद वाहतुकी साठी चांगले रस्ते, पिण्याचे शुद्ध व मुबलक पाणी मिळावे,युवावर्गाला रोजगार मिळावा या साठी मतदारसंघाचा विशेष प्रारूप आराखडा करणार असल्याचेही आ. घोरपडे यांनी सांगितले. आमदारपदी निवडुन आल्यानंतर मनोज घोरपडे यांच्यासह त्यांचे बंधु के. एम. शुगर चे एम. डी. संग्राम घोरपडे, संचालक विक्रम घोरपडे यांचा सपत्नीक नागरी सत्कार व विकास कामांच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम नांदगाव (ता. सातारा) झाला. यावेळी त्यांच्या मातोश्री माजी जि. प. सदस्या मंगलताई घोरपडे उपस्थित होत्या. आ. घोरपडे म्हणाले, कराड उत्तर मतदार संघ चार तालुक्यांमध्ये विस्तारला आहे. माजी आमदारांकडून गेली पंचवीस वर्ष मतदार संघाच्या विकासाकडे तसे दुर्लक्षच झाले आहे; आता मतदारांनी मला निवडुन दिले आहे. त्या प्रत्येक मतदाराला आ. मनोज घोरपडे आमदार झाले म्हणजे आम्ही आमदार झालो अशी भावना आहे. त्याच प्रमाणे जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत, ते सर्वजण मंत्री म्हणजे मीही मंत्री असे समजा. आमच्या एकत्रितपणातुन मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू ,या सर्वांना सोबत घेऊन आजपर्यंत विकासाचा जो अनुशेष होता, तो आता भरून काढला जाईल अशी ग्वाही दिली. सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात भाष्य करताना आ. घोरपडे म्हणाले, आम्ही फक्त ‘ कारखाना सामान्य सभासदांच्या ताब्यात देणार’ असं एकच वाक्य काढलं तर सध्याच्या चेअरमनांनी सभासद साखर मोफत अन् तीही घरपोहोच देण्याची घोषणा केली. आता अजुन काही बोललो तर सभासदांना जेवणाचे डब्बे घरपोहोच मिळतील ही आमची धास्ती आहे. यावेळी संग्राम घोरपडे, विक्रम घोरपडे, स्वाभिमानी महिला सखी मंचच्या कार्याध्यक्षा तेजस्विनीघोरपडे , पं. स. सदस्य संजय घोरपडे, उद्योजक सचिन देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे नेटके आयोजन ग्रामपंचायत, सेवा सोसायटीचे सर्व सदस्य, संचालक तसेच उद्योजक सचिन देशमुख, चेअरमन विठ्ठल देशमुख, आजी माजी सैनिक संघटना व समस्त ग्रामस्थ नांदगाव यांनी केले होते. या कार्यक्रमावेळी भाजपाचे अनेक आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नांदगाव परिसरातील रस्त्यांसाठी ९ कोटींचा निधी यावेळी भुमीपुजन झालेल्या बोरगाव नांदगाव रस्त्याच्या दोन टप्प्यासाठी साडे सहा कोटी , सासपडे निसराळे रस्त्यासाठी तीन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याची कामेही सुरू झाली आहेत. तर नांदगाव ते तारगाव रस्त्यासाठी पुरवणी अर्थ संकल्प तरतुदींमधुन दोन कोटी उपलब्ध करणार असुन बरीच वर्ष दुर्लक्षीत असणारा रस्ता करणार असल्याची घोषणा आ. मनोज घोरपडे यांनी कार्यक्रमात केली.