Karad News : आरोपींना घेऊन जाणाऱ्या व्हॅनने घेतला पेट; पोलिसांसह संशयित सुखरूप
कराड तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस व्हॅनला शनिवारी सायंकाळी अचानक भीषण आग (Karad News) लागली.

Karad News : कराड तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस व्हॅनला शनिवारी सायंकाळी अचानक भीषण आग (Karad News) लागली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण व्हॅन आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाली. मात्र, व्हॅन चालक शहाजी चव्हाण यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रेठरे (ता. कराड) येथील मारामारीच्या गुन्ह्यातील संशयितांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी सातारा येथे घेऊन पोलीस व्हॅन (Karad News) निघाली होती. दरम्यान, भेदा चौक परिसरात असताना अचानक व्हॅनमधून आग लागल्याचे निदर्शनास आले. काही क्षणांतच आगीने वेगाने पेट घेत संपूर्ण वाहनाला वेढा घातला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक शहाजी चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत व्हॅन तातडीने मोकळ्या जागेत उभी केली. त्यानंतर व्हॅनमधील सर्वांना त्वरित खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे संशयितांसह पोलिसांचेही प्राण वाचले. दरम्यान, आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, काही वेळातच संपूर्ण पोलीस व्हॅन आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
घटनेची माहिती मिळताच कराड पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली होती. पोलिसांच्या वाहनाला भरवस्तीत लागलेल्या या आगीमुळे भेदा चौक परिसरात (Karad News) एकच खळबळ उडाली. चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली, तरी पोलीस व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.






