प्रभात वृत्तसेवा नागठाणे – कराड उत्तर मतदारसंघातील प्रत्येक शेतकर्याच्या शेतीस पाणी देऊन, त्याचे जीवन समृद्घ होण्यासाठी मी कटिबद्ध असून, पाणी प्रश्नावर मोठे काम सुरू आहे, अशी ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.उरमोडी प्रकल्पांतर्गत गणेशवाडी उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन करंजोशी (गणेशवाडी) येथे आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राजेंद्र ढाणे, श्रीरंग गोरे, अजित साळुंखे, सुरेश पाटील, मदन काळभोर, अधिकराव पाटील, नंदकुमार नलवडे मुख्य अभियंता अमर काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार घोरपडे म्हणाले, याभागामध्ये पुनर्वसित गावांसह मूळ गावांमधील शेतीस गेली अनेक वर्ष पाणी मिळाले नव्हते. खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्याने गणेशवाडी उपसा सिंचन योजना मंजूर झाली आहे. या योजनेमुळे सासपडे, हरपळवाडी, गणेशवाडी, सोनापूर, जांभळेवाडी, अतीत, समर्थगाव आदी गावांमधील दोन हजार एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. या योजनेसाठी 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हे काम एका वर्षात पूर्ण केले जाईल. काम दर्जेदार आणि वेळेत होण्यासाठी मी लक्ष ठेवून असेन. त्याचबरोबर समर्थगाव आणि काशीळ उपसा सिंचन योजनांचे टेंडर लवकरच काढण्यात येईल. या तिन्ही योजना पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील हायवेच्या वरचा पूर्ण भाग ओलिताखाली येऊन, दुष्काळ संपेल. संपूर्ण क्षेत्र बागायती होणार आहे. कराड उत्तर वर्षभरात दुष्काळमुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने कराड उत्तरमधील 11 उपसा सिंचन योजना एक वर्षात पूर्ण होणार आहेत. त्यामुळे येथील दुष्काळ संपणार आहे, असे आमदार घोरपडे म्हणाले.