Karad News : कृष्णा कारखान्यासाठी 82.26 टक्के मतदान; निवडणूक प्रक्रिया शांततेत पार
शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (Karad News) सुमारे ७ हजार मयत मतदार वगळता सरासरी ८२.२६ टक्के मतदान झाले.

Karad News : शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (Karad News) सुमारे ७ हजार मयत मतदार वगळता सरासरी 82.26 टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कराड, वाळवा, कडेगाव, खानापूर या चार तालुक्यातील १३० गावांमध्ये शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली. सत्ताधारी भोसले गट आणि आव्हान देणारा महिते गट यांच्यात प्रतिष्ठेची लढत रंगली. या निवडणुकीकडे (Karad News) संपूर्ण सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील १५३ गावांमध्ये मतदान सुरू होताच सभासदांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली.
सहकार पॅनेलचे नेतृत्व विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले हे करत आहेत. तर संस्थापक पॅनेलचे नेतृत्व माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्यासह त्यांच्या पत्नी अर्चनाताई मोहिते करत आहेत. कारखान्यासाठी रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मतदान प्रक्रिया सुरू झाली. सातारा आणि सांगली जिल्ह्यात १५३ मतदान केंद्रामध्ये ५० हजार २५२ मतदारांचा समावेश होता.
यापैकी जवळपास ७ हजार सभासद मयत असून उर्वरित मतदारांपैकी ३५ हजार ५५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकीकडे असे असले तरी कारखान्याकडून देण्यात आलेल्या मतदार यादीनुसार ५० हजार २५२ मतदारांचा विचार करता सुमारे ७०.७३ टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील ६५ गावात कारखान्याचे सभासद आहेत. तर सांगलीच्या (Karad News) वाळवा तालुक्यातील ४२ गावे, कडेगाव तालुक्यातील २० आणि खानापूर तालुक्यातील ३ गावे अशा एकूण १३० गावात कृष्णा कारखान्याचे ५० हजाराहून अधिक सभासद आहेत.
मंगळवारी मतमोजणी
रविवारी सहकार पॅनलसह संस्थापक पॅनेलच्या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. दोन्हीकडे पॅनलकडून विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, दि. २३ जून रोजी कराडमधील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये पार पडणार आहे.






