Satara : प्लॅस्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कराड ऩगरपालिकेकडून कारवाई

कराड : – कराड नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील विविध भागांत विशेष मोहीम राबवून रस्त्यावर तसेच हातगाडे, फिरते विक्रेत्यांकडून बंदी असलेले प्लॅस्टिक वापरल्याने व उघड्यावर कचरा टाकल्याने दंडात्मक कारवाई करून साडेतीन किलो प्लॅस्टिक जप्त करून 900 रुपयाचा दंड करण्यात आला.
कराड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने राबवण्यात आलेल्या या मोहिमेत अनेक ठिकाणी बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर निदर्शनास आल्याने तीन व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पालिकेच्या सूचनांचे पालन व्यवसायिक विक्रेत्यांनी करावे असे आवाहन करून ही मोहीम दररोज सुरू राहणार असल्याचे आरोग्य विभाग प्रमुख गिरीश काकडे यांनी सांगितले.
शहरातील बुधवार पेठ, फुलेनगर ते शनिवार पेठ, राज मेडिकल परिसरात रस्त्याच्या दुतर्फा व्यवसाय करणाऱ्या तसेच फिरत्या विक्रेत्यांना, भाजीपाला विक्रेत्यांना वाहतुकीला अडथळा न होता रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्याच्या आत बसण्याबाबत त्या त्या भागातील पालिका मुकादम व कर्मचारी यांनी सूचना करून एकल वापर प्लॅस्टिक पिशवी वापरू नये अशा सूचना करून 75 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या न वापरण्याबाबत व उघड्यावर कचरा न टाकण्याबाबत आवाहन करण्यात आले.
या मोहिमेत आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे, स्वच्छ सर्वेक्षण अभियान समन्वयक आशिष रोकडे, वरिष्ठ मुकादम प्रमोद कांबळे व शहरातील प्रत्येक प्रभागातील मुकादम व आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.





