Kapil Sibal : शिंदे गट म्हणजे संपूर्ण शिवसेना पक्ष नव्हे; कपिल सिब्बल यांचा शिंदे गटाच्या भूमिकेवर आक्षेप
विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन वेगवेगळ्या संकल्पना असून, विधिमंडळ पक्षालाच मूळ राजकीय पक्ष मानता येणार नाही, असा युक्तिवाद करत ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी शिंदे गटाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला.

Kapil Sibal : एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना पक्ष होऊ शकत नाहीत. एकनाथ शिंदे गट हा केवळ विधिमंडळ पक्ष आहे आणि तो संपूर्ण राजकीय पक्ष नाही. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन वेगवेगळ्या संकल्पना असून, विधिमंडळ पक्षालाच मूळ राजकीय पक्ष मानता येणार नाही, असा युक्तिवाद करत ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी शिंदे गटाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला.
तसेच विधानसभा अध्यक्षांना राजकीय पक्षाच्या अंतर्गत रचनेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी त्यांचा रिजॉइंडर (प्रत्युत्तर) सादर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
जून 2022 मध्ये शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीचा संदर्भ देत सिब्बल म्हणाले, एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आणि भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधिमंडळ पक्षाला कोणी दिला, असा सवाल त्यांनी केला. यापूर्वीच अशा नियुक्त्या करण्याचा विधिमंडळ पक्षाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने अमान्य केला असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
तरीही विधानसभा अध्यक्षांनी याच निर्णयाच्या आधारे शिंदे गटाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली. मुंबईतून सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला जाण्याचा घटनाक्रम आधीपासून ठरवण्यात आला होता, असा दावाही त्यांनी केला.
अंतर्गत मतभेद आणि पक्षांतर यातील फरक
शिंदे गटाने आपण शिवसेनेतच असून केवळ काँग्रेससोबतच्या आघाडीला विरोध केला होता, अशी भूमिका मांडली. यावर सरन्यायाधीशांनी नेमका अंतर्गत मतभेद आणि पक्षांतर यातील फरक स्पष्ट करण्याची गरज असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती बागची यांनीही सरकारचे स्वरूप लक्षात घेऊन या दोन्ही बाबींचा विचार करावा लागेल, असे निरीक्षण नोंदवले.
मात्र, घटनापीठाने विधिमंडळ पक्षाला असा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले असताना शिंदे गटाची कृती केवळ अंतर्गत मतभेद कशी ठरू शकते, असा सवाल सिब्बल यांनी केला. दोन्ही गट स्वतःला शिवसेना म्हणत असतील तर 21 जून 2022 रोजी ठाकरे गटाने शिंदे यांना पक्षातून बाहेर काढल्यानंतर दोघेही शिवसेना कसे असू शकतात, असा प्रश्नही त्यांनी (Kapil Sibal) उपस्थित केला.






