कपिल सिब्बल म्हणाले- ‘जगदीप धनखड ‘बेपत्ता’, मला त्यांची काळजी वाटते, अमित शहांनी माहिती द्यावी, अन्यथा…’

नवी दिल्ली : राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक बेपत्ता होण्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत स्पष्ट निवेदन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. धनखड यांचा ठावठिकाणा न सापडल्यास सुप्रीम कोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करावी लागेल, असा इशाराही सिब्बल यांनी दिला आहे.
सिब्बल काय म्हणाले?
सिब्बल म्हणाले, “मला धनखड यांच्या सुरक्षेची काळजी वाटते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मी ‘लापता लेडीज’ चित्रपटाबद्दल ऐकलं होतं, पण ‘लापता उपराष्ट्रपती’ असं प्रथमच ऐकतोय. गृहमंत्रालयाला याबाबत नक्कीच माहिती असेल, त्यामुळे अमित शहा यांनी यावर निवेदन द्यावे. अन्यथा, धनखड यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आम्हाला सुप्रीम कोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करावी लागेल.”
सिब्बल यांनी पुढे सांगितले की, “धनखड यांनी त्यांच्या कार्यकाळात सरकारचे समर्थन केले, पण आता असे वाटते की विरोधकांनाच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागेल. मी त्यांना फोन केला होता, तेव्हा त्यांच्या खासगी सचिवांनी सांगितले की ते आराम करत आहेत. त्यानंतर कोणीही फोन उचललेला नाही. इतर अनेक नेत्यांनीही असाच अनुभव सांगितला आहे.”
राज्यसभेत चर्चेची मागणी फेटाळली –
७ ऑगस्ट रोजी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी धनखड यांच्या अनपेक्षित राजीनाम्यावर चर्चेची मागणी करणारी स्थगन सूचना फेटाळली. इंडियन युनियन मुस्लिम लीगचे (IUML) खासदार अब्दुल वहाब यांनी नियम २६७ अंतर्गत या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली होती, परंतु ती नामंजूर करण्यात आली.
धनखड यांचा २१ जुलै रोजी राजीनामा –
जगदीप धनखड यांनी २१ जुलै २०२५ रोजी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. २२ जुलै रोजी राज्यसभेत याची माहिती देण्यात आली. मात्र, अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, तो राजकीय दबावामुळे दिला गेला असावा, अशी शंका व्यक्त केली आहे. ७४ वर्षीय धनखड यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ पर्यंत होता. त्यांनी १० जुलै रोजी एका कार्यक्रमात म्हटले होते, “ईश्वराची कृपा राहिली तर ऑगस्ट २०२७ मध्ये मी निवृत्त होईन.”





