कपिल गुज्जरची भाजपमधून काही तासांत हकालपट्टी

नवी दिल्ली – शाहीनबाग आंदोलनावेळी हवेत गोळीबार करणाऱ्या कपिल गुज्जर याने बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, भलतेच घडल्याचे ध्यानात आल्यानंतर पक्षातून त्याची काही तासांत हकालपट्टी करण्यात आली.
दिल्लीलगत असणाऱ्या उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद भाजप जिल्हा शाखेत बसपच्या काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यामध्ये कपिलचाही समावेश होता. मात्र, काही तासांतच कपिलचा भाजप प्रवेश रद्दबातल ठरवण्यात आला.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फटकारल्यानंतर ते पाऊल उचलण्यात आल्याचे समजते. कपिलविषयीची माहिती नसल्याने तसे घडल्याचे पक्षाच्या संबंधित जिल्हा शाखेकडून सांगण्यात आले. करोना संकट दाखल होण्याआधी देशातील वातावरण नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (का) विरोधातील आंदोलनावरून ढवळून निघाले होते.
त्या आंदोलनाचे केंद्रस्थान दिल्लीतील शाहीनबाग परिसर ठरला होता. फेब्रुवारीत तिथे आंदोलन सुरू असताना कपिल पोहचला. हवेत गोळीबार केल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावेळी देशात हिंदूंचेच राज्य असेल, अशा आशयाच्या घोषणा त्याने दिल्या. त्याची नंतर जामिनावर सुटका झाली.





