Kanher Canal: कण्हेर उजव्या कालव्याला झाडाझुडपांचा विळखा; जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी संकटात
Kanher Canal: पहिल्या आवर्तनाचे पाणी सोडून १० दिवस उलटले तरी शेवटच्या वितरिकेपर्यंत पाणी नाही; जलसंपदा विभागाच्या कारभारावर शेतकरी आक्रमक.

Kanher Canal- कण्हेर धरण लाभ क्षेगांतर्गत शेतकर्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या उजव्या कालव्याला सध्या झाडाझुडपांचा विळखा पडला आहे. कालव्याची वेळेवर साफसफाई झाली नसल्याने पाण्याचा प्रवाह ठिकठिकाणी अडला असून, यावर्षीच्या पहिल्या आवर्तनाचे पाणी सोडून दहा दिवस उलटले तरी ते शेवटच्या वितरिकेपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे.
त्यामुळे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांची चिंता वाढली असून, जलसंपदा विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षामुळे कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे, झुडपे आणि गवत वाढल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण झाले आहेत. त्यातच उजवा कालवा सातारा शहराच्या उपनगरांसह औद्योगिक वसाहतीमधून प्रवाही होत असल्याने प्लास्टीक बाटल्या, थर्माकोलचे असंख्य तुकडे पाण्यासोबत वाहुन येतात.
ते कालव्यातील झाडाझुडूपांमध्ये अडकल्याने कालव्यात अनेक ठिकाणी पाण्याचा फुगवटा तयार होत असून, काही ठिकाणी अस्तरीकरण निकामी झाल्याने कालवा फुटण्याची शक्यता आहे. वेळेत साफसफाई आणि आवश्यक दुरुस्ती न झाल्यास पाण्याचा अपव्यय होण्याबरोबरच शेतजमिनींचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या कालव्यामध्ये आवर्तनाचे पाणी सोडून दहा दिवसांचा कालावधी उलटला आहे.
मात्र, झाडेझुडपे आणि अन्य अडथळ्यांमुळे पाण्याचा प्रवाह अपेक्षित गतीने पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. जलसंपदा विभागाचे कर्मचारी पाणी शेवटच्या वितरिकेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असले, तरी त्यांना अपेक्षित यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केवळ तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी कालव्याची संपूर्ण साफसफाई आणि तांत्रिक दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सन 1989-90 पासून प्रवाही झालेल्या कण्हेर उजव्या कालव्याच्या काही भागांतील अस्तरीकरण निकामी झाले असल्याने पाण्याचा फुगवटा निर्माण होणार्या ठिकाणी कालवा फुटीचा धोका वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा दाब वाढल्यास कालव्याला भगदाड पडणे किंवा कालवा फुटण्यासारखी घटना घडू शकते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित विभागाने कालव्याची तातडीने पाहणी करावी, अडथळे दूर करावेत आणि आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.





