Kangana Ranaut: “ज्यांनी माझं घर पाडलं, त्यांना जनतेनं जागा दाखवली”… बीएमसी निकालांवर कंगना राणावतची प्रतिक्रिया

Kangana Ranaut: मुंबई महापालिका (बीएमसी) निवडणूक २०२६ मध्ये भाजपाला मोठं यश मिळाल्यानंतर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत यांनी या निकालावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं आहे.
कंगना राणावत म्हणाल्या, “महाराष्ट्रातील बीएमसी निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या दणदणीत विजयामुळे मी खूप आनंदी आहे. हा आपल्या सगळ्यांचा विजय आहे.”
२०२० मध्ये, अविभाजित शिवसेना सत्तेत असताना बीएमसीने कंगना राणावत यांच्या मुंबईतील बंगल्याला जोडलेलं कार्यालय तोडलं होतं. त्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने ‘कायद्याचा गैरवापर’ असल्याचं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर कंगनाने पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली.
त्या म्हणाल्या, “ज्यांनी मला शिवीगाळ केली, माझं घर पाडलं, मला धमकावलं आणि महाराष्ट्र सोडून जा असं सांगितलं, आज त्यांनाच महाराष्ट्राने नाकारलं आहे.”
पुढे त्या म्हणाल्या, “महिलांचा तिरस्कार करणारे, दादागिरी करणारे आणि घराणेशाहीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेनं त्यांची योग्य जागा दाखवली, याचा मला आनंद आहे.”
बीएमसी निवडणुकीच्या कलांनुसार, २२७ पैकी २१० जागांचे निकाल समोर आले असून भाजप ९० जागांवर आघाडीवर आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना २८ जागांवर पुढे आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त ३ जागांवर आघाडी मिळाली आहे. विरोधी आघाडीत, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ५७, मनसेला ९, काँग्रेसला १५ आणि इतर पक्षांना ८ जागांवर आघाडी मिळाल्याचं दिसत आहे.
या निकालांमुळे मुंबई महापालिकेवरील उद्धव ठाकरे गटाची सत्ता संपुष्टात आल्याचं स्पष्ट झालं आहे. बीएमसीसारख्या देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेतील हा बदल महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा मानला जात आहे.





