Kane Williamson Dismissal: नशिबाचा खेळ! … अन् केन विल्यमसन स्वतःच स्टंपला लाथ मारून झाला आऊट, पाहा व्हीडिओ

Kane Williamson Dismissal Video: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टेस्ट मॅचला हॅमिल्टन येथे सुरूवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाखेर न्यूझीलंडने पहिली बॅटिंग करत 9 बाद 315 धावांपर्यंत मजल मारली. मात्र, या सामन्यातील न्यूझीलंडचा खेळाडू केन विल्यमसन ज्या पद्धतीने आऊट झाला, त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
विल्यमसनने 87 बॉलमध्ये 9 चौकारांच्या साहय्याने 44 धावा केल्या. तो मॅथ्यू पॉट्सच्या बॉलिंगवर बाद झाला. विलियमसन ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून क्रिकेट फॅन्स देखील चकीत झाले. स्वतः विल्यमसनला देखील त्यावर विश्वास बसला नाही.
व्हिडीओ – https://x.com/shivammm_/status/1867786208518218083
न्यूझीलंडच्या 59व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर विल्यमसन बाद झाला. विल्यमसनने मॅथ्यू पॉट्सचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा बॉल बॅटच्या वरच्या भागावर लागून थेट स्टंपच्या दिशेने गेला. यावेळी पायाने बॉल अडवण्याच्या नादाने विल्यमसनने थेट स्टंपलाच लाथ मारली. अशा विचित्र पद्धतीने आऊट झाल्याने विल्यमसनने देखील कपाळाला हात मारून घेतला.
दरम्यान, न्यूझीलंडने पहिल्या दिवसाखेर 9 बाद 315 धावा केल्या. या इनिंगमध्ये न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने 63 धावा आणि मिचेल सॅटनरने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर इंग्लंडकडून मॅथ्यू पॉट्स आणि गस अॅटिकसनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.





