Kane Williamson Coach : सुपर जायंट्सचा मोठा अन् ऐतिहासिक निर्णय! रिटेन केलेला खेळाडूच बनला थेट हेड कोच
Kane Williamson Coach : दक्षिण आफ्रिकन टी२० लीगच्या आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर, डर्बन सुपर जायंट्स संघात मोठा बदल होणार आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन मुख्य प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारण्याची शक्यता आहे.

Kane Williamson is set to replace Lance Klusener as Durban’s Super Giants head coach : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीग ‘एसए२०’ २०२७ हंगामापूर्वी डरबन सुपर जायंट्सने आपल्या प्रशिक्षक वर्गात मोठा आणि ऐतिहासिक बदल केला आहे. न्यूझीलंडचा माजी दिग्गज कर्णधार केन विल्यमसन याची आगामी हंगामासाठी संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली जात आहे. विल्यमसन हा दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज लान्स क्लुजनर यांची जागा घेईल, जे २०२३ मधील पहिल्या हंगामापासून या फ्रँचायझीशी जोडलेले होते.
खेळाडू म्हणून रिटेन, आता नव्या भूमिकेत जबाबदारी –
जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणाऱ्या विल्यमसनने २०२५ आणि २०२६ मध्ये डरबनकडून खेळताना १५ सामन्यांत ३४३ धावा केल्या होत्या. २०२७ साठी त्याला रिटेनही केले होते, पण आता तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल. चारपैकी तीन हंगामांत साखळीतच बाद झालेल्या या संघाने गेल्या वर्षी दहापैकी तीनच सामने जिंकून पाचवे स्थान मिळवले. आता १९ जानेवारीला प्रिटोरिया कॅपिटल्सविरुद्ध विल्यमसनच्या मार्गदर्शनाखाली संघ मोहिमेची सुरुवात करेल.
टॉम मूडी यांच्यासोबत आखणार विजयाची नवी रणनीती –
Familiar colours. New Role. One Super Giant ambition.
Kane Williamson takes his first step into head coaching ❤️💙
#DSG #WelcomeKane https://t.co/y722juOGsw
— Durban’s Super Giants (@DurbansSG) November 25, 2026
खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर केन विल्यमसनने प्रशिक्षकपद आणि रणनीतीच्या जगात यशस्वी पाऊल टाकले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तो आयपीएल फ्रँचायझी लखनौ सुपर जायंट्ससोबत स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझर म्हणून जोडला गेला होता. आता एसए२० मध्ये तो क्रिकेट संचालक टॉम मूडी यांच्यासोबत मिळून काम करेल. संघाच्या उर्वरित प्रशिक्षक वर्गाची घोषणा अद्याप बाकी असून, विल्यमसनच्या अनुभवाचा संघाला मोठा फायदा होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.
केन विल्यमसनची ऐतिहासिक आणि गौरवशाली आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
२०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या केन विल्यमसनने यंदा इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान निवृत्ती जाहीर केली होती. आपल्या शानदार कारकिर्दीत त्याने अनेक ऐतिहासिक विक्रम रचले. न्यूझीलंडसाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून त्याने कारकिर्दीचा शेवट केला. त्याने ११० कसोटी सामन्यांत ५४.०६ च्या सरासरीने ९,५१५ धावा केल्या, तर एकदिवसीय सामन्यांत ७,२५६ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २,५७५ धावा केल्या.





