Kanbai Mata: उद्योगनगरीत रंगला खान्देशोत्सव! कानबाई माता उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Kanbai Mata : पारंपरिक लोकनृत्य, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली सांगता

पिंपरी – खान्देशची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानबाई माता उत्सवानिमित्त शहरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या उत्सवाला खान्देशी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सप्तपूजन, कीर्तन, जागर, मिरवणूक, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय वातावरणाने भरावून गेला.
शनिवारी सायंकाळी कानबाई माता सप्तपूजनाचा आणि गहू दळण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी हभप रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांचे कीर्तन झाले. त्यांच्या कीर्तनातून कानबाई मातेचे महत्त्व, खान्देशची लोकपरंपरा आणि भक्तीची परंपरा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
रविवारी दुपारी समस्त खान्देश बांधव कानबाई उत्सव समितीच्या वतीने कानबाई माता मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
मिरवणुकीत खान्देशी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, धार्मिक वातावरण आणि कानबाई मातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीत खानेदेशी कलाकारांनीही सहभाग घेतला होता.
मिरवणुकीनंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. खानदेशी कलाकार भैय्या मोरे, पप्पू मोरे, विजय गायकवाड आणि राजश्री बडगुजर यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. तसेच हभप रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांनी खानदेशी लोकगीते सादर केली. उत्सवादरम्यान महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
सोमवारी (दि. २४) कानबाई माता उत्सवाची सांगता देवीच्या विसर्जन मिरवणुकीने झाली. यावेळी खानदेशी लोकनृत्य पावरीने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वाद्यांच्या तालावर आणि लोकनृत्याच्या उत्साहात भाविकांनी सहभाग घेतला.
लोकपरंपरेशी जोडलेली कानबाई माता
कान्हदेश म्हणजेच कान्हाचा देश. कालांतराने या नावाचा अपभ्रंश होऊन खान्देश हे नाव रूढ झाल्याचे मानले जाते. खान्देशातील कानबाई आणि रानबाई या प्राचीन लोकदैवतांना अनुक्रमे राधा आणि चंद्रावली अर्थात रुक्मिणीचे रूप मानले जाते. अहिर समाज कृष्णवंशी असून गोपालन हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय राहिला आहे.
राधा आणि चंद्रावली यांचा संबंध अहिर परंपरेशी जोडला जात असल्याने कानबाई आणि रानबाई या नावाने या देवींची भक्तिभावाने पूजा केली जाते. या दोन्ही देवींची उपासना अहिर समाजात प्राचीन काळापासून होत असल्याची मान्यता आहे. त्यामुळे कानबाई-रानबाई उत्सवाला धार्मिकतेसोबतच खान्देशच्या लोकजीवनात विशेष सांस्कृतिक महत्त्व आहे.





