Kamshet Police : पोलिसांची मोठी कारवाई! दरोड्याच्या तयारीत असलेले दोघे जाळ्यात; ११.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Kamshet Police : आरोपींच्या झडतीमध्ये मिरचीपूड, चाकू, कटर, लोखंडी रॉड, दोरखंड आणि कोयता जप्त; मोबाईल व महागड्या डिजिटल घड्याळांसह ११.५५ लाखांचा ऐवज जप्त.

Kamshet Police – कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत फिरत असलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत सुमारे ११ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी सहारा कॉलनीलगतच्या मोकळ्या मैदानात काही संशयित इसम फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असता एकनाथ रोकडे (वय २८) आणि संकेत माने (वय ३२) यांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यात मिरचीपूड, चाकू, कटर, लोखंडी रॉड, दोरखंड तसेच कोयता आढळून आला. तसेच आरोपींकडून मोबाईल फोन, डिजिटल घड्याळे व इतर साहित्य असा एकूण सुमारे ११ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या वस्तूंबाबत आरोपींकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात आरोपी तीन फरार साथीदारांसह परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र राऊळ यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना रात्रगस्त कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार सुहास सातपुते आणि पोलीस शिपाई रविंद्र राऊळ यांनी सरकारी वाहनातून पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. कामशेत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.





