लाडू देण्यास नकार..! कमलेशने थेट मुख्यमंत्र्यांकडं केली तक्रार; अधिकारी झाले आवाक

Madhya Pradesh News : एकच लाडू मिळाला म्हणून पठ्ठ्याने थेट मुख्यमंत्री हेल्पलाईनवर फोन केल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील हा प्रकार आहे. स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रमतर उपस्थित सर्वांना लाडू वाटप केले जात होते. यावेळी एका ग्रामस्थाला एक लाडू देण्यात आला, पण त्याला दोन लाडू हवे होते. जेव्हा त्याला दुसरा लाडू देण्यास नकार दिला गेला, तेव्हा त्याने पंचायत भवनाच्या बाहेरूनच थेट मुख्यमंत्री हेल्पलाइनवर फोन लावून आपली तक्रार नोंदवली. यामुळे अधिकारी देखील अवाक झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
कमलेश खुशवाहा नावाच्या ग्रामस्थाचा हा प्रकार आहे. १५ ऑगस्टला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात फक्त एकच लाडू मिळाला. कमलेशला मात्र दोन लाडू हवे होते. शिपायाने दुसरा लाडू देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या कमलेशने थेट पंचायत भवनाबाहेर उभं राहून मुख्यमंत्री हेल्पलाइनवर फोन लावला. त्याने तक्रारीत म्हटलं, “ग्रामपंचायतीने मिठाई वाटप नीट केलं नाही, याकडे लक्ष द्या!”
पंचायत सचिव रवींद्र श्रीवास्तव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या घटनेची पुष्टी केली. ते म्हणाले, “कमलेश रस्त्यावर उभा होता. त्याला एक लाडू देण्यात आला, पण तो दोन लाडूंसाठी आग्रह करत होता. नकार मिळताच त्याने हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली.” या तक्रारीमुळे पंचायत समितीत एकच खळबळ उडाली. अखेर हा वाद मिटवण्यासाठी पंचायतने बाजारातून १ किलो मिठाई विकत घेऊन कमलेशची माफी मागितली.
हा प्रसंग जितका हास्यास्पद आहे, तितकाच शासकीय यंत्रणांवरील अनावश्यक ताण आणि छोट्या गैरसमजांचे मोठे परिणाम दाखवतो. याची तुलना २०२० मधील भिंडमधीलच एका घटनेशी होत आहे, जिथे खराब हँडपंपच्या तक्रारीवर कार्यकारी अभियंता पी.आर. गोयल यांनी तक्रारदाराला ‘वेडा’ म्हटलं होतं. त्यावेळीही मोठा वाद झाला होता, आणि गोयल यांनी आपल्या आयडीचा गैरवापर झाल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.





