वाॉशिंग्टन : आता अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला जेमतेम आठवडा उरला आहे. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस या दोन्ही उमेदवारांनी आपला निवडणूक प्रचार तीव्र केला असून एकमेकांवर शाब्दिक हल्लेही तीव्र केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एका निवेदनात म्हटले आहे की, कमला हॅरिस राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यास त्या तिसरे महायुद्ध सुरू करू शकतात. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनियामध्ये निवडणूक प्रचार कार्यक्रमादरम्यान कमला हॅरिसवर निशाणा साधला की, ‘जर ती राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आली तर अमेरिका तिसऱ्या महायुद्धात अडकेल याची खात्री आहे कारण तिला जागतिक घडामोडींची काहीच माहिती नाही आणि तिला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी कसे बोलावे हे माहित नाही. ट्रम्प म्हणाले की, ‘त्यांना राष्ट्रपती बनवणे म्हणजे देशातील लाखो लोकांच्या मुलांच्या जीवाशी जुगार खेळण्यासारखे आहे.’ ट्रम्प म्हणाले की, महायुद्धाचा धोका आताच्यापेक्षा मोठा कधीच नव्हता. ते म्हणाले की, ते या पदावर असते तर इस्रायलवर 7 ऑक्टोबरला झालेला हल्ला झाला नसता. डेमोक्रॅटिक पक्षानेही निवडणूक प्रचारात पूर्ण जोर लावला आहे. त्यामुळेच माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामाही कमला हॅरिस यांच्या समर्थनार्थ रॅली काढत आहेत. मिशिगनमध्ये शनिवारी झालेल्या रॅलीत मिशेल ओबामाही कमला हॅरिस यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनविण्याविरोधात लोकांना इशारा दिला. मिशेल ओबामा यांनी ट्रम्प यांचे मानसिक आरोग्य, त्यांचे चालू असलेले अफेअर आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपांचा समाचार घेतला.