राज्य करण्यास कमला हॅरिस अयोग्य; डोनाल्ड ट्रम्प यांची टीका

वॉशिंग्टन : डेमोक्रॅटिक पक्षाच्या संभाव्य उमेदवार कमला हॅरिस या राज्य करण्यास अयोग्य असल्याची टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हॅरिस या मूलगामी डाव्या विचारांचे वेड लेगलेल्या असल्याने नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत मतदार त्यांना नाकारतील, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या संभाव्य उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांनी बुधवारपासूनच आपल्या प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी हॅरिस यांच्यावर भर सभेमध्ये टीका केली आहे.
गेल्या साडे तीन वर्षात बायडेन प्रशासनाच्या प्रत्येक चुकीच्या निर्णयामागे कमला हॅरिस याच होत्या. त्या कट्टरवादी डाव्या विचारांनी पछाडलेल्या असल्याने जर देशाचे नेतृत्वकरण्याची संधी त्यांना मिळाल्यास त्या देशाचे वाटोळे करतील. आम्ही तसे होऊ देणार नाही. कमला हॅरिस अति उदारमतवादी आहेत. तसे असणे धोकादायक आहे. हॅरिस यांना मत देणे म्हणजे आणखी चार वर्षांची अप्रामाणिकता, अक्षमता, कमकुवतपणा आणि अपयशाला मत देणे, असे ट्रम्प म्हणाले.
जेव्हा तुम्ही अशा लोकांना आपल्याबरोबर घेता तेव्हा ते खूप धोकादायक लोक असतात. त्यामुळे तुमची हरकत नसेल तर मी छान होणार नाही. ते ठीक आहे का? असे प्रेक्षकांच्या प्रचंड टाळ्यांच्या आवाजात त्यांनी विचारले. ट्रम्प यांनी पूर्वी बायडेन यांना स्लीपी ज्यो (झोपाळू) असे संबोधले होते. आता त्यांनी कमला हॅरिस यांना उद्देशून लीएन कमला (खोटारडी) असे म्हटले आहे. त्यांच्या तुलनेत आपण अधिक चांगले आहोत. विशेषतः गोळीबार झाल्यानंतर आपण अधिक चांगले झालो असल्याचेही ट्रम्प म्हणाले.





