Kamal Nath : माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम?

Kamal Nath : गेल्या 48 तासांपासून मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये सुरू असलेले राजकीय नाट्य आता संपत असल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ मुलगा नकुल नाथ आणि समर्थक आमदार/नेते यांच्यासह भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याच्या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे.
कमलनाथ काँग्रेसमध्येच राहणार – सज्जन सिंग वर्मा
कमलनाथ यांच्या जवळचे नेते सज्जन सिंग वर्मा यांनी दिल्लीत कमलनाथ यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले, ‘ते म्हणतात की कुठे जाण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या व्यक्तीने इंदिराजी, राजीव जी आणि संजयजी यांच्यासोबत काम केले आहे, ज्यांना इंदिराजींचे तिसरे पुत्र म्हटले जाते, त्यांनी कुठेही जाण्याची कल्पना करणे अर्थहीन आहे.” वर्मा म्हणाले की, विद्यमान खासदार नकुल नाथ हे लोकसभेचे छिंदवाडा मतदारसंघाचे काॅंग्रेसकडून पुन्हा उमेदवार असणार आहेत.
उमंग सिंघार यांना मध्य प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेते बनवल्याने नाराज होते कमलनाथ –
भोपाळमधील एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले की, ‘उमंग सिंघार यांना मध्य प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेते बनवण्यापूर्वी कमलनाथ यांना विश्वासात घेतले गेले नाही, यावरुन कमलनाथ नाराज होते. राज्यसभेच्या जागेसाठीही त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला नाही. यानंतर त्यांनी शक्तीप्रदर्शनाचा मार्ग निवडला. छिंदवाड्यातील आमदार आणि इतर नेत्यांसह त्यांनी ज्या प्रकारे दिल्लीत तळ ठोकला आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर मौन बाळगले, त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेला मोठा धक्का बसला आहे.
कमलनाथ यांनी राज्यसभेसाठी ताकद दाखवली –
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, ‘पीसीसी प्रमुख जितू पटवारी आणि विरोधी पक्षनेते उमंग सिघार यांच्यासह तरुण पिढीने प्रदेश काँग्रेसची कमान हाती घेतली आहे. राज्याच्या राजकारणात नाथ यांच्यासाठी काहीच उरले नव्हते, त्यामुळे त्यांना राज्यसभेवर जावेसे वाटले. जे नेते त्यांच्यासोबत दिल्लीत तळ ठोकून आहेत, त्यांचे अस्तित्व कमलनाथ यांच्यावरच आहे, त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी राज्यसभेच्या जागेसाठी त्यांचे नाव बाजूला सारले, ज्यानंतर नाथ यांनी कथितरित्या भाजपमध्ये सामील होण्याचा किंवा ताकद दाखवण्याचा निर्णय घेतला.
रविवारीच काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांनीही आपण कमलनाथ यांच्या सतत संपर्कात असून ते कुठेही जात नसल्याचे सांगितले होते. सिंग म्हणाले की, ईडी, आयटी आणि सीबीआयचा दबाव सर्वांवर आहे, कमलनाथ यांच्यावरही दबाव आहे पण ते दबावाखाली येणारे नेते नाहीत.
दरम्यान, एकंदरीत राजकीय वर्तुळातून येणाऱ्या माहितीनुसार, कमलनाथ यांची भाजपमध्ये दाखल होण्याची योजना रद्द झालेली आहे.





