Kamal Haasan : द्रमुकने शब्द पाळला! अभिनेता कमल हासन राज्यसभेवर जाणार

Kamal Haasan – तामिळनाडूच्या सत्ताधारी द्रमुकने बुधवारी घोषणा केली की, ते १९ जून रोजी होणाऱ्या द्वैवार्षिक राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातील सहा जागांपैकी चार जागांवर निवडणूक लढवतील. द्रमुकने तीन जागांवर आपले उमेदवार उभे केले आणि एक जागा सहयोगी अभिनेता-राजकारणी कमल हासन यांच्या नेतृत्वाखालील मक्कल निधी मय्यम (एमएनएम) यांना दिली.
द्रमुकने वरिष्ठ सभागृहातील आपले विद्यमान सदस्य, वरिष्ठ वकील पी. विल्सन यांना पुन्हा उमेदवारी दिली. याशिवाय, सलेम नेते एस. आर. शिवलिंगम यांनाही पक्षाने उमेदवारी दिली. यासह कवी, लेखक आणि पक्षाचे पदाधिकारी रुकैया मलिक उर्फ कविगनार सलमा यांनाही तिकीट देण्यात आले.
आसाममधील बिरेंद्र प्रसाद बैश्य (भाजप) आणि मिशन रंजन दास (भाजप) यांचा कार्यकाळ १४ जून रोजी संपत आहे. त्याचप्रमाणे, तामिळनाडूच्या अंबुमणी रामदास (पीएमके), एन. चंद्रशेखरन (एआयएडीएमके), एम. षणमुगम (द्रमुक), पी. विल्सन (द्रमुक) आणि वैको (एमडीएमके) यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मक्कल निधी मय्यम औपचारिकपणे तामिळनाडूमध्ये द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील झाल्यानंतर, कमल हासन यांना निवडणुकीनंतर लोकसभा किंवा राज्यसभेची जागा लढवण्याचा पर्याय देण्यात आला. तथापि, ७० वर्षीय कमल हासन यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला.
तामिळनाडू विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार, द्रमुकचे १३४ आमदार आहेत. पक्षाला राज्यसभेच्या सहा जागांपैकी चार जागा मिळण्याची अपेक्षा आहे. उर्वरित दोन जागा अण्णाद्रमुककडे जाण्याची शक्यता आहे. त्यांनी पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली आहे.
यापूर्वी, निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या आठ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची तारीख जाहीर केली होती. आसाममधील दोन आणि तामिळनाडूतील सहा राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ जून आणि जुलैमध्ये संपत असल्याने निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केली होती.
१९ जून रोजी मतदान, निकाल…
१. अधिसूचना जारी – २ जून
२. नामांकन – ९ जून
३. अर्जाची छाननी – १० जून
४. अर्ज मागे घेणे – १२ जून
५. मतदान व मतमोजणी – १९ जून
६. प्रक्रिया पूर्ण – २३ जून





