कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण: रक्त नमुने बदलणाऱ्या सात जणांवर दोषारोप निश्चित

पुणे – रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी असलेले अग्रवाल दाम्पत्य आणि ससूनच्या डॉक्टरांसह एकूण सात आरोपींवर दोषारोप निश्चितीचा मसुदा पोलिसांनी विशेष न्यायाधीश यू .एम् मुधोळकर यांच्या न्यायालयात सादर केला आहे. तसेच या प्रकरणात अरुणकुमार सिंगला फरारी म्हणून घोषित करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज देखील केला आहे. त्यावर दि. ६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल, त्याची पत्नी शिवानी अग्रवाल, ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, अश्पाक मकानदार, अमर गायकवाड अशा एकूण सात आरोपींवर दोषारोप निश्चित केले आहेत.
या दोषारोप निश्चितीचा मसुदा पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे. तसेच पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचविण्यासाठी यापूर्वी अटक कारण्यात आलेला आरोपी आदित्य सूद आणि आशिष मित्तल यांनी ससूनच्या डॉक्टरांना लाच दिली. त्यानंतर आदित्यने एका मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांच्या जागी स्वत:च्या रक्ताचा नमूना दिला, तर आशिषने आरोपी अरुणकुमार सिंग याच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलाच्या जागी स्वत:चे रक्त दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
मात्र, अरुणकुमार सिंग त्या दिवसापासून फरार होता. उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे अरुणकुमार सिंग याला फरार घोषित करण्यासाठी भारतीय दंडविधान कलम ८२ अंतर्गत अर्ज केल्याची माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली.
पासवर्डमुळे मोबाइल ओपन होण्यास अडचण
या प्रकरणात पोलिसांनी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांचे मोबाइल जप्त केले होते. मात्र, मोबाइलला पासवर्ड आहे. त्यामुळे मोबाइल ओपन होत नाही. यासंदर्भात दोघांची चौकशी करायची आहे त्यासाठी परवानगी मिळण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे. मुधोळकर न्यायालयाने पोलिसांना दोघांची चौकशी करण्यासाठी परवानगी दिली आहे.





