Kalyan Banerjee: मोठी बातमी ! बंगालमध्ये कल्याण बॅनर्जींवर हल्ला ; भाजपने सर्व आरोप फेटाळले
Kalyan Banerjee: पश्चिम बंगालमधील वातावरण सध्या हिंसक बनत चालल्याचे दिसत आहे.

Kalyan Banerjee: पश्चिम बंगालमधील वातावरण सध्या हिंसक बनत चालल्याचे दिसत आहे. कारण तृणमूल पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता आणखी एका टीएमसीच्या नेत्यावर हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हुगळी याठिकाणी चंडीताला पोलीस ठाण्यासमोर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या डोक्यावर दगड किंवा चेंडूसारख्या वस्तूने मारून त्यांना जखमी केल्याचा आरोप टीएमसी खासदाराने केला आहे. मात्र, भाजपचा दावा आहे की, ते जखमी झाले नाहीत आणि केवळ नाटक करत होते.
डोक्यावर ओला रुमाल बांधून कल्याण बॅनर्जी यांनी आरोप केला की, चंडीताला पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की, लोकशाही मार्गाने आपला निषेध नोंदवण्यासाठी जाणाऱ्या लोकांवर हल्ला केला जात आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, अटक केलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी करणारे निवेदन सादर करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचले असता, निवेदन सादर होण्यापूर्वीच तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली.
भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल समर्थकांविरुद्ध ‘चोर, चोर’ अशा घोषणाबाजीने परिस्थिती आणखी चिघळवली. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त आणि केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते.






