Kalyan Banerjee : तृणमूल कॉंग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर; कल्याण बॅनर्जींनी दिला मुख्य प्रतोदपदाचा राजीनामा

कोलकता : तृणमूल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सोमवारी पक्षाच्या लोकसभेतील मुख्य प्रतोदपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली. ममतांनी सोमवारी तृणमूलच्या खासदारांची ऑनलाइन बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी संसदीय पक्षात समन्वयाचा अभाव असल्याची नाराजी व्यक्त केली. त्या बैठकीनंतर काही तासांत कल्याण यांनी राजीनामा दिला.
दिदींनी (ममता) समन्वयाचा अभाव असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे मुख्य प्रतोद म्हणून दोष माझ्यावर येतो. ती बाब विचारात घेऊन मी ते पद सोडले, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. दिदींनी खासदार बनवलेले काही जण क्वचितच लोकसभेच्या कामकाजात सहभागी होतात. त्यामध्ये माझा काय दोष? बेशिस्तीसाठी इतरांना जबाबदार ठरवण्याऐवजी पक्ष मला दोष देत आहे. त्यामुळे मला अपमानित झाल्यासारखे वाटते, अशी तीव्र प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
कल्याण यांचे स्वपक्षातील काही खासदारांशी मतभेद असल्याचे दडून राहिलेले नाही. त्यांचा याआधी हाय-प्रोफाईल नेत्या महुआ मोईत्रा आणि माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद या स्वपक्षाच्या खासदारांशी वाद झाला. त्याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने तृणमूलची नाचक्की झाली. ममतांनी बैठकीत नाराजी व्यक्त करण्याचे तेही कारण असल्याचे मानले जाते.
दरम्यान, कल्याण यांनी राजीनामा दिल्यानंतर तृणमूलच्या उच्चस्तरावरून तातडीने त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न झाला. ममतांचे खासदार भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. किमान आणखी काही दिवस मुख्य प्रतोदपद सोडू नका. आपण ७ ऑगस्टला प्रत्यक्ष भेटून चर्चा करू, असे अभिषेक यांनी सांगितल्याचे नंतर कल्याण यांनी नमूद केले.





