Pune District : कैलास औटींची बाजी; सत्ताधार्यांचे समीकरण ढासळले

बेल्हे : जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक बेल्हे गावातील बेल्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागल्याने सत्ताधारी गटाचे समीकरण पूर्णपणे बिघडले आहे. सत्ताधारी गटाकडे स्पष्ट बहुमत असतानाही विरोधी गटाचे उमेदवार कैलास औटी यांनी आपल्या संघटनकौशल्य आणि लोकाभिमुख वर्तनाच्या जोरावर विजय मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
सहायक निबंधक, सहकारी संस्था जुन्नर येथे गुरुवारी (दि. 9) निवडणूक प्रक्रिया पार पडली. एकूण 17 संचालकांपैकी सर्व संचालक उपस्थित होते. सत्ताधारी गटाकडून काशिनाथ गुंजाळ, तर विरोधी गटाकडून कैलास औटी यांनी उमेदवारी दाखल केली होती. मतदानाच्या वेळी सत्ताधार्यांकडे 10 सदस्य असूनदेखील, निकाल औटींच्या बाजूने लागला. गुंजाळ यांना 8 मते, तर औटींना 9 मते मिळून त्यांनी थरारक विजय नोंदवला. या निकालाने सत्ताधारी गटातील अंतर्गत मतभेद उघडकीस आले आहेत. बहुमत असूनदेखील, काही सदस्यांनी असंतोषातून विरोधी उमेदवाराला मत दिल्याची चर्चा रंगली आहे.
बेल्हे हे जुन्नर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रभावशाली आणि इतिहासप्रसिद्ध गाव आहे. कै. राजाभाऊ गुंजाळ, कै. रामभाऊ बोरचटे आणि कै. धोंडीभाऊ पिंगट यांच्या काळात गावात ऐक्याचे वातावरण होते; मात्र त्यांच्या निधनानंतर गटबाजी वाढल्याने सत्ताधारी गटावर नामुष्कीची वेळ आली आहे.





