बीड जिल्ह्यात सरपंचाची हत्या: रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण, जमावाने एसटी बस पेटवली

बीड – बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथे सरपंचाचे अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. संतोष देशमुख असे सरपंचाचे नाव असून त्यांचा मृतदेह केज परिसरात आढळून आला. मृताच्या नातेवाईकांनी अहिल्यानगर -अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनं बीड जिल्हा हादरला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही या घटनेची दखल घेत मस्साजोग गाव गाठलं आहे. तर, दुसरीकडे दुपारच्या सुमारास या रास्ता आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने एसटी महामंडळाची बस पेटवून दिली. पोलिस आणि आंदोलन आमने-सामने आले होते.
मनोज जरांगे यांनी देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करत या घटनेसंदर्भात वरिष्ठ पोलिसांशी फोनवरून संवाद साधला. मनोज जरांगे म्हणाले, मस्साजोग गावच्या सरपंचाच्या हत्येची घटना दुर्दैवी आहे. बीड जिल्ह्याला कलंक लावण्याचे काम सुरू आहे. सुजाण आणि चांगल्या जनतेला वेठीस धरण्याचे, त्रास देण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे. या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.
देशमुखांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक –
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जयराम माणिक चाटे (रा. तांबवा ता.केज) आणि महेश सखाराम केदार (रा. मैंदवाडी ता.धारुर) अशी आरोपींची नावे आहेत. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून इतर आरोपींची माहिती घेण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत.
शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं- खासदार बजरंग सोनवणे
बीड जिल्हा सरपंचाच्या हत्येने हादरला असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावरून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया देताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केलंय. जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर आहे, अतिशय टॉर्चर करून सरपंच यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी पकडले आणि त्यांना लगेच जामीन देखील मिळाला. असा कसा जामीन झाला, असा सवाल बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. आरोपीसोबत चार तास पोलिस निरीक्षक होते. पोलीस अधिकारी आरोपींना पाठीशी घालत आहेत, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हत, असे म्हणत सोनवणे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टोला लगावला आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हे सोमवारी दुपारी 3 वाजता, केजहून (एम. एच. 44 बी. 3032) कारने गावाकडे निघाले होते. गावातील शिवराज देशमुख हा त्यांची कार चालवत होता. डोणगाव फाट्याच्या पुढील टोलनाक्याच्या डाव्या बाजूच्या शेवटच्या लाइनमधून कार जात होती. त्याचवेळी रस्त्याच्या मधोमध हल्लेखोरांनी स्कॉर्पिओ (एम. एच. 44 झेड. 9333) आडवी लावली. स्कॉर्पिओतून उतरलेल्या सहा हल्लेखोरांपैकी एकाने कारच्या दरवाज्याची काच दगडाने फोडली. नंतर कारच्या डाव्या बाजूला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांना खाली ओढून काठीने मारहाण केली. त्यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवून अपहरण केले. ही जीप सुदर्शन घुले (रा.टाकळी ता. केज) यांची असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी सुदर्शन घुले व इतर 5 जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल होता.





