पिंपरी | कै. आण्णासाहेब मगर स्टेडिअमचा होणार ‘मेक ओव्हर’

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कै. आण्णासाहेब मगर स्टेडिअम आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी शहरातील पहिला पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स क्लब उभारण्यात येणार आहे. प्रशासनाने या प्रकल्पाचा ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ तयार केला आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या माध्यमातून शहराच्या क्रीडा क्षेत्राला नवा आयाम मिळणार आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून कै. आण्णासाहेब मगर स्टेडिअमचे पुनरुज्जीवन करण्यात करण्यात येत आहे. मात्र, हे स्टेडिअम अन्यत्र स्थलांतरित करण्यात येईल, असा ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरविण्याचा प्रयत्न राजकीय हेतुने केला जातो आहे. परंतु, यामध्ये तथ्य नाही. पिंपरी-चिंचवड शहराला स्पोर्टस् सिटी बनवण्याचा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.
त्या संकल्पनेतूनच भोसरीतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी व कुस्ती संकुल विकसित झाले. यासह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाची ऑर्चरी, बॉक्सिंग रिंग, रायफल शूटींग, स्केटिंग अशी क्रीडा संकुल उभारली आहेत. आता आण्णासाहेब मगर स्टेडिअम व पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स क्लब होणार असल्यामुळे शहराच्या सौंदर्यात आणि लौकिकातही भर पडणार आहे.
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात दुर्लक्ष
मगर स्टेडिअमच्या नूतनीकरणाचा निर्णय भाजपच्या सत्ताकाळात 2019 मध्ये घेण्यात आला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या कामाला विरोध केला होता.
दरम्यान, राज्यात सत्ता परिवर्तन झाले. महाविकास आघाडीची सत्ता आली. पण, मविआच्या अडीच वर्षांच्या काळात स्टेडिअमबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने नूतनीकरणाचे काम ‘जैसे थे’ होते.
आता महायुतीच्या सत्ताकाळात स्टेडिअमसह पिंपरी-चिंचवड स्पोर्टस् क्लबच्या कामासाठी कार्यवाही केली जात आहे. पण, महाविकास आघाडीतील इच्छुकांकडून स्टेडिअमच्या कामाचे राजकारण केले जात आहे. तसेच, चुकीच्या माहितीच्या आधारे पिंपरी-चिंचवडकरांमध्ये ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवण्यात येत आहे, असे आमदार लांडगे यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या असणार सुविधा
या स्टेडिअममध्ये बॅडमिंटन कोर्टस्, स्क्वॅश कोर्टस्, रेस्टॉरंट, जिम्नॅशिअम, हेल्थ क्लब, बॅन्क्वेट फॅसिलिटी, कार्ड रुम, मिटिंग रुम, बिझनेस सेंटर, रेसिडेन्सिअल रुम, टेनिस, स्विमिंग पूल, चिल्ड्रन एरिया, जॉगिंग ट्रॅक अशा सोयी-सुविधा निर्माण होणार आहेत. त्यामुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रातील हा स्टेडिअम केंद्रबिंदू ठरणार आहे.
डेक्कन जिमखान्याच्या धर्तीवर होणार विकास
मगर स्टेडिअमचा विकास 26 एकर जागेत होणार असून, या ठिकाणी पुण्यातील डेक्कन जिमखानाच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स क्लबही उभारण्यात येत आहे. शहराच्या क्रीडा व मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून स्टेडिअम संचलित केले जाणार आहे. याठिकाणी शॉपिंग मॉल, हॉटेल्स, क्लब हाउस, अॅकॅडमी निर्माण होतील. त्यामुळे क्रीडा, संस्कृती, मनोरंजन आणि आकर्षक वास्तू उभारण्यात येणार आहेत.





