Pune District : खाते वाटपावरून कहीं खुशी कहीं गम

बारामती : कॅबिनेट मंत्र्यांची संख्या फार मोठी आहे. 37 कॅबिनेट मंत्री आहेत. आणि 6 राज्यमंत्री आहेत. त्यामुळे एका एका राज्यमंत्र्यांकडे सहा सात खाते गेली. संख्या जास्त झाल्यामुळे कॅबिनेटमध्ये प्रत्येकाला एक एक खातं देण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली आए. ज्यांना असे वाटते की, आपल्याला चांगले खाते मिळाले ते समाधानी आहेत. ज्यांना हवे ते खाते मिळाले नाही. ते असमाधानी आहेत, हे चालतच असते, असे विधान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केले.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या नाही. त्यानंतर त्यांनी त्यांची नाराजी जाहीर व्यक्त केली. वेळ पडल्यास राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा सुचक इशारा देखील त्यांनी केला होता. दरम्यान, बारामतीत रविवारी (दि. 22) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकामांची पाहणी केली त्याचबरोबर नागरिक सत्कार ही स्वीकारला, त्यावेळी अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता भाष्य केले.
अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाने मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्यातूनच त्यांच्या कामाची चुणूक महाराष्ट्राला पाहायला मिळते. प्रशासनावर त्यांची कशी पकड आहे. काम कसे करतात. लोकांचे प्रश्न कसे सोडवतात. या सर्व गोष्टी दृष्टीपटात येतात. तसेच सध्या राज्यात 288 पैकी 237 जण एका बाजूला आहोत. एवढ्या मोठ्या संख्येने बहुमत मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी ठरवले आहे की, जनतेने एवढा मोठा विश्वास आपल्यावर टाकल्यानंतर सर्व समाजाला बरोबर घेऊन चांगल्या प्रकारे शेवटच्या लोकांपर्यंत जाऊन काम करू आणि महाराष्ट्राला पुढे नेले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
नाराजी दूर केली जाईल
यंदाच्या मंत्रिमंडळात काहींना संधी देऊ शकलो नाही. त्यांनी नाराज होऊ नये अथवा गैरसमज देखील करून घेऊ नये. आगामी काळात त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळात किंवा इतर ठिकाणी देखील संधी दिली जाईल. कोणी वेगळ्या प्रकारची वक्तव्य करू नयेत, अशा सूचना देखील अजित पवार यांनी केल्या.
बीडमधील घटनेचा मास्टरमाईंड कोणीही असला तरी…
बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या घटनेतील मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याला सोडणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात याबाबत उत्तरे दिले आहेत. याबाबत कडक कारवाईचे आदेश देखील देण्यात आले आहेत. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. बीडमधील या घटनेमुळे आमची देखील शरमेने मान खाली गेली आहे. फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आरोपींना सोडायचे नाही. जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती किंवा कोणाचे धाडस होणार नाही. याबाबत न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल तसेच वेळ पडल्यास फास्टट्रॅक कोर्टातही प्रकरण चालवले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.





