कडेगाव, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र विकसित राज्य आहे. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी अनेकांचे योगदान असून, त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. डॉ. पतंगराव कदम यांनीही शिक्षणासह विविध क्षेत्रांत उत्तम काम करून महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. महाराष्ट्राच्या विकासाबरोबच काँग्रेसच्या विचारधारेबरोबर राहून त्यांनी पक्षाला ताकद दिली, असे गौरवोद्गार लोकसभेतील विरोधीपक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी काढले. राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व ‘लोकतीर्थ’ या स्मारकाचे अनावरण खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना मोहनराव कदमनगर, वांगी येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. कडेगाव येथील भारती विद्यापीठ मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयातील ग्रंथालयाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, तर क्रीडागृहाला पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले असून, त्यांचे नामकरणही करण्यात आले. या वेळी अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथला, सरचिटणीस खा. के. सी. वेणुगोपाल, खा. मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी आमदार मोहनराव कदम, विजयमाला कदम, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष विक्रम सावंत, स्वप्नाली कदम, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. छत्रपती शाहू महाराज, खासदार विशाल पाटील उपस्थित होते. खासदार गांधी पुढे म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांची कामाची पद्धत पारदर्शक होती. त्यांची कधीही चुकीची कामे केली नाहीत म्हणून त्यांना कधीही जनतेची माफी मागावी लागली नाही. खरगे म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षण क्षेत्राचा विस्तार सांगलीपासून दिल्लीपर्यंत केला. डॉ. विश्वजीत कदम हे डॉ. पतंगराव कदम यांनी दाखविलेल्या मार्गवरून वाटचाल करीत आहेत. विश्वजीत कदम म्हणाले, गेल्या 60 वर्षांपासून कदम कुटुंबीय काँग्रेसशी जोडले गेले आहे. कठीण परिस्थितीतही काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. पतंगराव कदम व मोहनराव कदम यांनी जीवाचे रान केले. त्यांनी दुष्काळी भागाचे अक्षरश: नंदनवन केले. अनेकांचे आयुष्य घडले – शरद पवार डॉ. पतंगराव कदम यांनी समाजातील प्रत्येक घटकातील मुला-मुलींना शिक्षण मिळावे, यासाठी दूरदृष्टी ठेवून शिक्षण संस्था सुरू केल्या. गोरगरीबांना शिक्षणाची द्वारे खुली झाल्याने आणि उच्च दर्जाचे शिक्षण मिळाल्याने अनेकांचे आयुष्य घडले. या भागातील पाण्याची गरज ओळखून त्यांनी अनेक प्रकल्प उभे केले. त्यामुळे अनेकांचे संसार उभे राहिले. तीच परंपरा विश्वजित कदम पुढे नेत आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले.