Sandeep Nangal : कबड्डीपटू नांगलची सामन्यादरम्यान हत्या; चार जणांनी केला गोळीबार

जलंधर – भारताचा अंतरराष्ट्रीय कब्बडीपटू संदीप नांगल याची चार अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली आहे. पंजाबमधील जलंदर येथे सोमवारी सायंकाळी संदीप एका स्पर्धेतील सामन्यात खेळत असतानाच ही धक्कादायक घटना घडली.
शाहकोट येथील मल्लियन कालन गावामध्ये एका कब्बडी स्पर्धेमध्ये संदीप सहभागी झाला होता. त्याचवेळी त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला झाल्याचे स्थानिक पोलीसांनी सांगितले आहे. चार जण एका कारमधून आले आणि सामना सुरु असतानाच संदीपवर अंधाधूंध गोळीबार केला. या प्रकरणात पोलीसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतरच याबाबतची अधिक माहिती देता येईल, असेही पोलीसांनी म्हटले आहे.
संदीपवर एकूण आठ ते दहा गोळ्या चालवण्यात आल्या तसेच घटनास्थळी पोलीसांना 10 रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. संदीपवर हल्ला झाल्यानंतर जखमी अवस्थेत त्याला नाकोडर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याला तिथे मृत घोषित करण्यात आले. दरम्यान सोशल मीडियावर या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तींबरोबरच गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची धावधावही दिसून येत आहे.
संदीप हा नांगल अंबियान गावातील रहिवाशी होता. संदीप त्याच्या कुटुंबासोबत इंग्लंडमध्ये स्थायिक झालेला होता. मात्र कब्बडीच्या प्रेमापोटी तो सातत्याने भारतात येऊन विविध स्पर्धांमध्येही सहभागी होत होता.





