कॉ.पानसरे ,दाभोळकर यांना मानवंदना 

थ्रीडी प्रिन्टींगने परवडणाऱ्या किंमतीत ,कमी वेळेत साकार होणार घरे

नगर: समाजात उन्नतचेतना क्रांतीचे बीजे रोवणारे कॉ.गोविंद पानसरे व डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने उन्नतचेतना क्रांती प्रवर्तकाची मानवंदना देण्यात आली. तर हुतात्मा स्मारकात झालेल्या बैठकित घरकुल वंचितांची घरे परवडणाऱ्या किंमतीत व कमी वेळेत साकार होण्यासाठी शासनाने थ्रीडी प्रिन्टींग नवतंत्र अवलंब करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी ऍड.कारभारी गवळी, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, शारदा जंगम, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल, लीला वाघमारे, अशोक भोसले, संगीता साळूंखे, शाहिन शेख, नजमा खान, अनिता भालेराव, महेश भोसले, संजय अडागळे, फरिदा शेख, हिराबाई शेकटकर आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दाभोळकरांनी पिढ्यानपिढ्या अंधश्रध्देत गुरफटलेल्या समाजाला वैज्ञानिक दृष्टीकोन दिला. यामुळे समाजातील अंधश्रध्दा दूर होऊन विकासाला गती मिळाली. तर कॉ.पानसरे यांनी जातीय विषमता दूर करण्याचे कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास बहुजन समाजापुढे आणून, सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. जातीय दंगली हद्दपार करुन, जातीय सलोखा प्रस्थापित करण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच जात संपविण्याचे तंत्र शोधणारे अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ.ब्रुस एच.लिप्टन उन्नतचेतनेचे अभ्यासक डॉ.ख्रिश्‍चन क्विंची यांना देखील उन्नतचेतना क्रांती प्रवर्तकची मानवंदना देण्यात आली. डॉ.ब्रुस यांनी बायोटेक्‍नोलॉजी ऑफ बिलिफ करेकशन्स या तंत्राने जात संपविण्याचे तंत्र जगाला दिले आहे. तसेच डॉ.ख्रिश्‍चन यांनी उन्नतचेतनेचा जगात प्रचार प्रसार करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे.

या बैठकित घरकुल वंचितांची घरे साकार होण्यासाठी भारतात थ्रीडी प्रिन्टिंग तंत्राचा अवलंब कसा करता येईल? या बाबत चर्चा करण्यात आली. प्रगत राष्ट्रांमध्ये कमी वेळेत व सर्वांना परवडेल अशा किंमतीत घरे होण्यासाठी थ्रीडी प्रिन्टिंग तंत्राचा अवलंब करण्यात आला आहे. या तंत्राच्या सहाय्याने एखादी वसाहत किंवा छोटे उपनगर देखील नियोजनात्मक पध्दतीने उभारता येऊ शकते. घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी लॅण्ड पुलिंग योजनेतंर्गत इसळक, निंबळक येथील शेतकरी पड जमीनी देण्यास तयार आहेत. या जागेवर थ्रीडी प्रिन्टिंग तंत्राच्या सहाय्याने कमी वेळेत परवडणारी घरे साकार होऊन त्याचा दर्जा देखील उच्च प्रतीचा राहणार असल्याचे ऍड.कारभारी गवळी यांनी सांगितले. या लोकसभेच्या निकालानंतर स्थापन होणाऱ्या नवीन सरकारापुढे या योजनांचा प्रस्ताव ठेऊन, पाठपुरावा करण्याचा या बैठकित निर्णय घेण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here