K.N.Panikkar : भारतीय इतिहासलेखन क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, प्रख्यात विचारवंत आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्राध्यापक के.एन.पणिक्कर (K.N.Panikkar) यांचे सोमवारी वृद्धापकाळामुळे खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. प्रा. पणिक्कर (K.N.Panikkar) हे त्यांच्या मार्क्सवादी इतिहास संशोधनासाठी आणि धर्मनिरपेक्ष व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पुरस्कारासाठी जगभरात ओळखले जात. आधुनिक भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना त्यांनी मांडलेले पुरोगामी विचार आणि जातीयवादावर केलेली परखड टीका यामुळे त्यांनी आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. जेएनयूमध्ये इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून काम केल्यानंतर त्यांनी केरळमधील श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू पदही भूषवले. तसेच, केरळ कौन्सिल फॉर हिस्टोरिकल रिसर्चचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी २००१ ते २०१७ या प्रदीर्घ काळात महत्त्वपूर्ण योगदान दिले. २००८ मध्ये भारतीय इतिहास काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या पणिक्कर यांनी वसाहतवाद आणि आधुनिकता या विषयांवर अनेक मोलाचे ग्रंथ लिहिले आहेत. इतिहासाचे भगवेकरण आणि शालेय अभ्यासक्रमातील बदलांविरुद्ध त्यांनी वेळोवेळी दिलेला लढा ऐतिहासिक मानला जातो. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन कन्या आहेत, तर त्यांच्या पत्नीचे यापूर्वीच निधन झाले आहे.