Jyotiba Phule Death Anniversary: आजच्या सावित्रींना महात्मा लाभतील? महात्मा ज्योतिराव फुलेंकडून आजच्या पुरुषांनी धडे घ्यावे असं सर्व काही…

Jyotiba Phule Death Anniversary: ज्योतिराव फुलेंच नाव उच्चारलं, की सावित्रीमाईचं नाव आपोआप ओठांवर येतं. कारण हे नातं ‘पती-पत्नी’ या चौकटीपलीकडे जाऊन ‘विचारसहचरत्वा’चं प्रतीक बनलं आहे. समाजात पितृसत्तेला जेव्हा उच्च स्थान होतं, तेव्हा पुरुषांच्या खांद्यावर ठेवलेली सर्वाधिकारांची पिशवी जोतिबांनी धाडसाने दूर फेकली. आणि हाच क्षण होता, ज्यातून सावित्रीचा दर्जा ‘पत्नी’ वरून ‘सहप्रवासी’ झाला.
समतेच्या प्रवासातील पहिला विचार: सावित्री
स्त्रीशिक्षणाची गरज ओळखताना ज्योतिबांनी पहिल्यांदा विचार केला तो सावित्रीबाईंचा. तिला वाचता येईल का? समाज परवानगी देईल का? स्त्रीने शाळेत जाणं पाप मानणाऱ्या काळात, तुम्ही तिला ओळख करून दिलीत, “तू शिकलीस तर समाज शिकेल.”
त्या काळी, एका स्त्रीने समाजाविरुद्ध लढायचं ठरवलं की तिचा पहिला संघर्ष तिच्या घरातल्या पुरुषाशी असे. पण सावित्रीबाईंच्या बाबतीत हा संघर्ष नव्हता. कारण त्यांच्या मागे तुम्ही उभे होतात. तिच्या प्रत्येक पावलाला सामर्थ्य देणाऱ्या तुमच्या उपस्थितीमुळेच ती पहिली शिक्षिका होऊ शकली, न्यायाची योद्धा बनू शकली.
स्वतंत्र व्यक्तिमत्वांचं सहजीवन
तुमचं आणि सावित्रीचं नातं ‘टिपिकल’ सहजीवनाचं उदाहरण कधीच नव्हतं. ‘मी-तु’ या चौकटीत अडकलेलं नव्हतं. दोघेही विचारांनी स्वतंत्र, पण ध्येयाने एकत्र. तुम्ही नव्या युगाची व्याख्या केली, “पती-पत्नी म्हणजे आज्ञाधारकता नव्हे; तर समानतेचा प्रवास.” असमानतेवर उभारलेल्या व्यवस्थेला विरोध करताना तुमचं ध्येय स्पष्ट होतं, कुणी उच्च नीच नाही तर सगळे ‘माणूस’ म्हणून समान महत्त्वाचे.
त्या काळातील क्रांतीचे पाऊल
ज्या समाजात शूद्र-अतिशूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, स्त्रियांना प्रश्न विचारण्याची परवानगी नव्हती, विधवांना ‘अस्तित्व’ नाही असं मानलं जायचं, त्या समाजात तुम्ही ‘शाळा’च नव्हे तर नवप्रकाशाचं दार उघडलंत. शिक्षण हे सर्वांसाठी हा तुमचा धाडसी आदेश होता. स्त्री-पुरुष समानतेचा विचार तुम्ही कृतीतून जगलात. विधवाश्रम, बालहत्या प्रतिबंध यांसारख्या उपक्रमांनी व्यवस्थेची असंवेदनशीलता उघडी पाडली.
आज सावित्रीच्या वाटा चालताना जोतिबा कुठे?
आजही असंख्य स्त्रिया सावित्रीच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जायचा प्रयत्न करतात. त्या शिकतात, काम करतात, समाजाच्या चौकटी मोडण्याचं धाडस करतात. पण त्यांना सावित्रीला मिळालेली “ज्योतिबांची साथ” आजही सहजासहजी मिळत नाही. ज्योतिबांसारखे प्रिव्हिलेज नाकारणारे पुरुष आजही कमीच आहेत. स्त्रीला ‘स्वतंत्र मनुष्य’ म्हणून पाहणारी दृष्टी अजून विकसित व्हायची आहे. म्हणूनच तुमचं स्मरण म्हणजे केवळ ऐतिहासिक घटना नाही तर ते आजच्या समाजासाठी दिशादर्शन आहे.
ज्योतिबांचा वारसा: माणूसपणाचे मूल्य
तुम्ही दाखवून दिलंत प्रेम म्हणजे अधिकार नव्हे, तर सोबत. संबंध म्हणजे नियंत्रण नव्हे, तर समता. आणि माणुसकी म्हणजे नेमकं ते. आणि ज्याला पितृसत्तेचे विशेषाधिकार मिळतात, तो ते नाकारून ‘माणूस’ म्हणून जगणं निवडतो.
तुमच्या पुण्यतिथीनिमित्त ज्योतिबा, तुमच्या साहसाला, विचारांना, आणि तुमच्या ‘मानवतेच्या वारशाला’ शतशः प्रणाम. कारण ज्योतिराव फुले हे नाव म्हणजे एक क्रांती, एक दिशा, आणि एक अद्वितीय माणूसपण!





