Allahabad High Court : अलाहाबाद हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी न्या.यशवंत वर्मा यांची नियुक्ती

लखनौ : न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागल्याच्या घटनेनंतर बेहिशेबी रोख रक्कम सापडल्याची माहिती समोर आली होती. या घटनेमुळे यशवंत वर्मा हे चांगलेच चर्चेत आले होते. प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा झाली. यानंतर या प्रकरणात अंतर्गत चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यांची समिती देखील स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते.
या आरोपानंतर न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली. यानंतर आता न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे. मात्र, यशवंत वर्मा यांनी न्यायाधीशपदाची शपथ घेतली असली तरी त्यांच्याकडे कोणतेही न्यायालयीन कामकाज सोपवले जाणार नाही, अशी माहिती सांगितली जात आहे.
दरम्यान, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना त्यांच्या पदाची शपथ ज्या गुप्त पद्धतीने देण्यात आली त्याबद्दल बार असोसिएशनने निषेध नोंदविला आहे. बार असोसिएशनने म्हटले की, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना त्यांच्या पदाची शपथ ज्या गुप्त पद्धतीने देण्यात आली ती अयोग्य वाटते. न्यायाधीशांच्या शपथ घेण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. आमच्या पाठीमागे शपथ देण्यात आली त्या पद्धतीचा आम्ही स्पष्टपणे निषेध करतो. त्यामुळे पुन्हा एकदा लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे, असा आरोप बार असोसिएशनकडून करण्यात आला.





