Kareena Kapoor : “‘ॲनिमल’ हिट झाला म्हणून सगळेच…”; करीनाने दाखवला बॉलिवूडला आरसा, व्यक्त केलं परखड मत
Kareena Kapoor : बॉलिवूडमध्ये एखादा फॉर्म्युला यशस्वी ठरल्यानंतर त्याच धाटणीचे चित्रपट बनवण्याच्या प्रवृत्तीवरही करीनाने निशाणा साधला.

Kareena Kapoor : बॅालिवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या तिच्या आगामी ‘दयारा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट १८ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या करीनाने नुकत्याच एका मुलाखतीत बॉलिवूडमधील ‘समूह मानसिकते’वर आपले परखड मत व्यक्त केले आहे.
यावेळी तिने अभिनेता रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या यशाचा संदर्भ देत चित्रपटसृष्टीतील एका प्रवृत्तीवर टीका केली. करीनाच्या मते, सध्याचा प्रेक्षक पूर्वीपेक्षा अधिक जाणकार आणि पारखी झाला आहे. केवळ एखादा अभिनेता किंवा चित्रपटाचा प्रकार पाहून प्रेक्षक चित्रपट पाहण्याचा निर्णय घेत नाहीत, तर चांगला आशय आणि दर्जेदार सिनेमा यांना ते अधिक पसंती देतात.
करीना म्हणाली, “आपले प्रेक्षक आपल्या कल्पनेपेक्षा खूप जास्त पारखी आहेत. चांगला चित्रपट कोणता असतो, हे त्यांना माहीत आहे आणि त्यांना तो पाहायचा असतो. आज चित्रपट केवळ तरुण प्रेमकथेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. अशा अनेक गोष्टी आता कालबाह्य झाल्या आहेत. मात्र, हिंसा अजूनही प्रचलित आहे.”
बॉलिवूडमध्ये एखादा फॉर्म्युला यशस्वी ठरल्यानंतर त्याच धाटणीचे चित्रपट बनवण्याच्या प्रवृत्तीवरही करीनाने निशाणा साधला. ती म्हणाली, “आपल्यात कळपाची मानसिकता आहे, मी आणखी काय सांगू? एकदा ‘ॲनिमल’ प्रदर्शित झाला की प्रत्येकजण हिंसेचा आधार घेऊ लागतो.” असे ती म्हणाली.
यासोबतच करीनाने बदलत्या प्रेक्षकवर्गाबद्दलही महत्त्वाचे वक्तव्य केले. आज प्रेक्षक ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपट पाहायचा की नाही, याचा निर्णय घेतात. विशेषतः तरुण प्रेक्षक अधिक प्रश्न विचारत असून, त्यांना विचार करायला भाग पाडणारा आशय अपेक्षित असल्याचे तिने सांगितले.
“केवळ विनोदी चित्रपट आहे म्हणून लोक तो नक्कीच पाहतील, असा विचार करून चित्रपट बनवता येणार नाही. प्रत्येक चित्रपट २०० किंवा ५०० कोटी रुपये कमावणार नाही. मला वाटतं, आम्ही ही मानसिकता बदलत आहोत आणि प्रेक्षकही त्यासाठी आम्हाला मदत करत आहेत.”असेही करीनाने स्पष्ट केले.
दरम्यान, करीना कपूर आता ‘दयारा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात करीनासोबत पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे.
‘ॲनिमल’च्या यशाने बॉक्स ऑफिसवर घातला होता धुमाकूळ
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने जगभरात ९०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती.






