लेण्याद्री कोविड केअर सेंटरच्या मदतीला धावले जुन्नरचे व्यापारी

जुन्नर(प्रतिनिधी) – जुन्नर तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांसाठी लेण्याद्री कोविड केअर एक वरदान ठरले आहे. मात्र तालुक्यातील वाढता आकडा पाहता येथे असलेले १०० बेड्स कमी पडू लागले होते. त्यानंतर प्रशासनाने केलेल्या आवाहनाला जुन्नर शहर व्यापारी असोसिएशनने तातडीने ५० बेड्स व त्यासोबतचे आवश्यक साहित्य देऊ केले आहेत. या साहित्य खरेदीसाठी आवश्यक दीड लाखाचा धनादेश तहसीलदार हनुमंत कोळेकर आणि नायब तहसिलदार सचिन मुंढे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष कन्हैया खोत यांनी दिली.
दरम्यान, या लेण्याद्री येथील केंद्रामुळे तालुक्यातील संशयित रुग्णांचे पुणे येथील हेलपाटे आणि तेथील त्रासदायक प्रतिक्षा वाचल्याचे उपाध्यक्ष राजेंद्र लुणावत यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच येथील केंद्रप्रमुख डॉ. शाम बनकर आणि आरोग्य खात्याच्या योग्य उपचार पद्धतीमुळे आजपर्यंत तब्बल ७९ पॉझिटिव्ह रुग्ण सुखरूपपणे घरी परतल्याची माहिती उल्हास शाह यांनी दिली. त्यामुळे वाढते रुग्ण पाहता येथील बेड्स वाढविणे गरजेचे होते.
याप्रसंगी जीवन आहुजा, सुनील कर्पे, मनोज लुणावत, अतुल बोकरिया, अमर भगत, सुनील शिंदे, संजय कर्पे, कुंदन परदेशी आदी व्यापारी उपस्थित होते.





