Junnar News – जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात गावरान खजूर आणि रानमेवा म्हणून ओळखली जाणारी शिंदाडीची झाडे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या काही वर्षांपासून या झाडांपासून मिळणारी ताडी आणि नीरा या पेयांच्या हव्यासापायी झाडांची संख्या झपाट्याने घटत आहे. शासनाने आणि वनविभागाने वेळीच खबरदारी घेतली नाही, तर भविष्यात ही बहुउपयोगी वृक्ष प्रजाती पूर्णपणे नष्ट होण्याची भीती वृक्षप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील उदापूर, डिंगोरे, मढ, खिरेश्वर, करंजाळे यांसह पुष्पावती व मांडवी नदीकिनारी पूर्वी शिंदाडीची लाखो झाडे पाहायला मिळत होती. या झाडाला मधुर, गोड आणि काहीशी तुरट चवीची खजुरासारखी फळे येतात. या झाडाच्या फांद्यांपासून झाडू बनवले जातात. मात्र, ताडी विक्रीच्या परवान्यांमुळे या झाडांचे लिलाव होऊ लागले आहेत. ताडी काढण्यासाठी झाडाच्या शेंड्याला मोठा काप दिला जातो, ज्यामुळे काही कालावधीतच झाड वाळून खराब होते. यामुळे ताडी विक्रेते श्रीमंत होत असले, तरी निसर्गाची कधीही भरून न निघणारी हानी होत आहे. वृक्षमित्र आणि ग्रीनव्हज फाउंडेशनचे संतोष वाळेकर यांनी या समस्येकडे लक्ष वेधले असून, वनविभागाने शिंदाडीच्या झाडांच्या संवर्धनासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याचे सांगितले. मानवी स्वार्थासाठी निसर्गातील एक महत्त्वाची प्रजाती नष्ट होणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक ठरणार आहे. कशामुळे झाड खराब होते * शिंदाडीच्या झाडाला जेथून झावळ्या फुटतात, तिथे ताडीसाठी मोठा काप दिला जातो. * मडके लावून रस काढण्यासाठी दररोज हा काप मोठा केला जातो, ज्यामुळे झाड वाळते. * नदीकाठच्या आणि बांधावरील झाडांची संख्या यामुळे वेगाने घटत आहे.