Junnar News : पिंपळवंडी चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणी 633 पानी दोषारोपपत्र दाखल
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील साडेनऊ वर्षांच्या चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा (Junnar News) तपास पूर्ण करून पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

Junnar News : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील साडेनऊ वर्षांच्या चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा (Junnar News) तपास पूर्ण करून पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून २ सप्टेंबर २०२६ रोजी दोषारोपपत्र सादर करण्यात आले. आरोपी साहिल खैरे (वय २५) याच्याविरुद्ध हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी आरोपीने पेरू देण्याचे आमिष दाखवून चिमुरडीला ऊसाच्या शेतात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला (Junnar News) अटक केली. या प्रकरणात खून, बलात्कार, बारा वर्षांखालील मुलीवरील बलात्कार आणि अपहरणाच्या आरोपांसह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी तपासावर देखरेख केली. आळेफाटा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वास जाधव यांनी तपासी अधिकारी म्हणून पुरावे संकलित केले.
तपासादरम्यान घटनास्थळाचा पंचनामा, पीडितेचे वैद्यकीय अहवाल, न्यायवैद्यक अहवाल, साक्षीदारांचे जबाब तसेच तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे संकलित करण्यात आले. या सर्व बाबींचा समावेश दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.
गावातील तक्रारींचीही पडताळणी
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान काही नवीन साक्षीदार पुढे आले असून त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आरोपीच्या वर्तनाबाबत गावपातळीवर यापूर्वी काही तक्रारी अथवा नाराजी असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. मात्र, यासंदर्भात पोलिसांकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नव्हती. त्यामुळे या माहितीचीही स्वतंत्रपणे पडताळणी करण्यात आली आहे.
जलदगती न्यायालयाची मागणी
घटनेनंतर अवघ्या पंधरा दिवसांत पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. मात्र, या गंभीर प्रकरणाचा (Junnar News) खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची अद्याप नियुक्ती झालेली नाही. खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.






